पुणे: महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाची (ZP Elections) दिशा ठरवणाऱ्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून, दुपारपर्यंत राज्याच्या राजकारणातील सत्तेचे ‘मिनी मंत्रालय’ कोणाच्या ताब्यात जाणार, याचे चित्र स्पष्ट होईल.

यावेळची निवडणूक केवळ आकडेवारीची नाही, तर ती एका अत्यंत भावूक आणि अनपेक्षित वळणावर येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात झालेले निधन ही या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात मोठी आणि धक्कादायक घटना ठरली. या घटनेमुळे विशेषतः पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रचाराचा जोर ओसरला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी सभा रद्द केल्या होत्या. त्यामुळे, नेहमीप्रमाणे होणारा धडाकेबाज प्रचार न करताच मतदान झाले आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग (कोकण), पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर (पश्चिम महाराष्ट्र) आणि छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील नेत्यांसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. महानगरपालिकांमध्ये भाजपने वर्चस्व राखले असले, तरी शेती आणि ग्रामीण विकासाशी निगडित असलेल्या जिल्हा परिषदांमध्ये महाविकास आघाडी पुन्हा मुसंडी मारणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
आज 12 जिल्हा परिषदांच्या 731 जागा आणि 125 पंचायत समित्यांच्या 1,462 जागांचा निकाल लागेल. सरासरी 68.28% मतदान झाले असून, मतदारांचा हा वाढलेला टक्का प्रस्थापितांना धक्का देतो की सत्ताधाऱ्यांना बळ देतो, हे थोड्याच वेळात समजेल.







