पुणे: पुण्यात 2 वर्षांच्या एका चिमुकलीचे भीक मागण्यासाठी अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी 5 जणांना अटक केली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी सुनील भोसले (वय 51), शंकर पवार (वय 50), गणेश पवार (वय 35), मंगल काळे (वय 19) आणि शालूबाई काळे (वय 45) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी तिघे तुळजापूरचे, तर एक पुण्याचा आहे. दरम्यान, आरोपींना न्यायालयाने त्यांना 2 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

ही घटना 25 जुलै रोजी मध्यरात्री घडली. कात्रज येथील धनसिंग हनुमंत काळे यांच्या पत्नीने आपल्या 2 वर्षांच्या मुलीला झोळीत झोपवले होते. दुसरी मुलगी रडल्याने कुटुंबियांना जाग आली आणि त्यांनी पाहिले असता, झोळीत त्यांची लहान मुलगी नव्हती. त्यांच्या घरातून ही चिमुकली बेपत्ता झाली होती. त्यांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी कारवाई केली असता, 5 जणांचा अटक करण्यात आली आहे. अटक केलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. भीक मागण्यासाठी लहान मुलांना चोरून नेणारी त्यांची मोठी टोळी असण्याची शक्यता आहे. या टोळीकडे आणखी लहान मुले आहेत का? याचा तपास सुरू आहे. तसेच, या गुन्ह्यात आणखी कोण सामील आहे, याचाही शोध घेतला जात आहे. पोलिस तपासातून आरोपी तुळजापूर, जिल्हा धाराशिव येथे असल्याचे समोर आले. पोलिसांनी तपास करत 3 आरोपींना तुळजापूर येथून, तर खडकी येथील रेंज हिल परिसरातून 2 आरोपींना ताब्यात घेतले.
कात्रज ते पुणे स्टेशनदरम्यान १४० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. यातील 3 आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. सरकारी वकील अमर ननावरे यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. यापूर्वीही त्यांनी असे गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. दरम्यान, या आरोपींविरुद्ध बीएनएस कलम १३९ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी हा गुन्हा कट रचून केला असल्याचा संशय असल्याने सखोल चौकशीसाठी त्यांना पोलिस कोठडी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले असता आरोपींना २ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि स्वप्निल पाटील करत आहेत.







