मुंबई: मुंबईतील बॉडीबिल्डिंग क्षेत्रातून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध बॉडीबिल्डर सागर माळी यांचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन झाले. ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ या नावाने ते बॉडीबिल्डिंग क्षेत्रात परिचित होते. त्यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्रातील अनेकांना मोठा धक्का बसला आहे.

सागर माळी यांनी अनेक वर्षांच्या मेहनतीतून बॉडीबिल्डिंगच्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. 2013 मध्ये त्यांनी ‘मुंबई श्री’ हा प्रतिष्ठेचा किताब पटकावला. या कामगिरीनंतर त्यांची मुंबईतील बॉडीबिल्डिंग क्षेत्रात विशेष ओळख निर्माण झाली आणि त्यांना ‘रॉनी’ या टोपणनावाने ओळखले जाऊ लागले.

यानंतर सागर यांनी राज्य आणि देशपातळीवरील विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांनी ‘मिस्टर महाराष्ट्र’चा किताबही जिंकला होता. तसेच ‘मिस्टर इंडिया’ स्पर्धेत 3 वेळा विजेतेपद मिळवत त्यांनी राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्येही त्यांनी सहभाग घेतला होता.

मात्र, गेल्या काही वर्षांपासून सागर यांच्या आरोग्याची स्थिती गंभीर होती. ते मूत्रपिंडाच्या आजाराशी झुंज देत होते. दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्यानंतर त्यांच्यावर डायलिसिस सुरू होते. उपचार आणि आरोग्याच्या समस्यांशी लढा देत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. सागर यांच्या निधनाची बातमी समोर येताच चाहत्यांनी शोक व्यक्त केला.







