अमेरिका: अमेरिकेतील एका फेडरल डिस्ट्रिक्ट कोर्टातून न्यायव्यवस्थेला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका न्यायाधीशाने आपल्या अधिकृत सरकारी चेंबरमध्ये, तेही थेट कामाच्या वेळेत, एका वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. न्यायालयातील कर्मचारी आणि लॉ क्लार्क यांनी केलेल्या अधिकृत तक्रारीनंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली आणि हा लज्जास्पद प्रकार जगासमोर आला.

दोघांचे चेंबरमध्येच अश्लील चाळे सुरु असायचे. न्यायालयाच्या आवारात वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे कर्मचारी आणि इतर स्टाफमध्ये नेहमी कुजबूज चालत असे. सीएनबीसी (CNBC) च्या अहवालानुसार, या जिल्हा न्यायाधीशाचे संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासोबत गेल्या 2 वर्षांपासून विवाहबाह्य प्रेमसंबंध सुरू होते. अखेर या त्रासाला कंटाळून न्यायालयातील एका क्लार्कने मुख्य न्यायाधीशांकडे या वर्तणुकीबद्दल लेखी तक्रार नोंदवली.
या प्रकरणात तथ्य शोधण्यासाठी शेवटी 7 न्यायाधीशांचे एक विशेष तपास पथक नेमण्यात आले. या समितीने सादर केलेल्या अहवालातील माहिती अतिशय थक्क करणारी होती. हे दोन्ही जण जेव्हा बंद खोलीत एकत्र असायचे, तेव्हा त्यांचे आवाज कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांपर्यंत सहज पोहोचायचे. या लज्जास्पद प्रकारामुळे कोर्टातील इतर सहकाऱ्यांना आपले दैनंदिन काम करताना प्रचंड संकोच आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता.

सुरुवातीला संबंधित न्यायाधीशाने आपल्यावरील प्रत्येक आरोप फेटाळत स्वतःला निर्दोष सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, तपास समितीने पुरावे सादर केले, तेव्हा मात्र त्याचा नाईलाज झाला आणि त्याने स्वतःची चूक मान्य केली.

दोषी सिद्ध झाल्यानंतर आता या न्यायाधीशावर कडक कायदेशीर आणि प्रशासकीय निर्बंध लादण्यात आले आहेत. भविष्यात या न्यायाधीशाला कधीही फेडरल कोर्टाचे मुख्य न्यायाधीश होता येणार नाही, तसेच कोणत्याही न्यायालयीन समितीचे सदस्यत्वही मिळणार नाही. यासोबतच, न्यायालयाची प्रतिष्ठा धुळीस मिळवल्याबद्दल आणि कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास दिल्याबद्दल संबंधित क्लार्कची जाहीर माफी मागण्याचे आदेशही त्यांना देण्यात आले आहेत.






