पाटणा: पाटणा जवळील फुलवारीशरीफ (Patana News) भागातील एकता नगरमध्ये घडलेला एक अनोखा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. एका पतीने तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या पत्नीच्या हालचालींवर लक्ष ठेवत तिला तिच्या प्रियकरासोबत रंगेहाथ पकडल्याचा प्रकार समोर आला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पतीला पत्नीवर आधीपासून संशय होता. मात्र थेट वाद न घालता त्याने शांतपणे योजना आखली. त्याने पत्नीच्या सँडल, बॅग आणि घरात गुपचूप जीपीएस डिव्हाइस बसवले. त्यानंतर तो कामावर जात असताना मोबाईलवरून तिच्या हालचालींचा मागोवा घेत होता.
काही वेळानंतर लोकेशन संशयास्पद वाटल्याने तो अचानक घरी परतला. घराचा दरवाजा उघडताच त्याला पत्नी तिच्या कथित प्रियकरासोबत आढळली. हा प्रकार पाहून त्याने संताप व्यक्त केला आणि तेथे मोठा गोंधळ उडाला.
गोंधळाचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. काही जणांनी पतीची बाजू घेतली, तर काहींनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला समर्थन दिले. या दरम्यान ढकलाढकली आणि किरकोळ मारामारीही झाली. रागाच्या भरात पतीने प्रियकराकडील परवानाधारक पिस्तूल आणि सोन्याची साखळी हिसकावून घेतल्याचाही आरोप आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तिन्ही जणांना पोलीस ठाण्यात नेले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणावर चर्चा आणि वाद सुरू होते.
शेवटी पोलिसांच्या मध्यस्थीनंतर पती, पत्नी आणि प्रियकर यांच्यात तडजोड झाली. तिघांनीही कोणतीही कायदेशीर कारवाई नको असल्याचे लेखी दिले. त्यानंतर सर्वांना सोडण्यात आले. हा संपूर्ण प्रकार ‘GPS लव्ह स्टोरी’ म्हणून परिसरात चर्चेत आहे.







