अहमदाबाद: गुजरातमध्ये मोडासा (Gujrat Crime) येथे एका 19 वर्षांच्या तरुणीची तिच्याच (Crime News) कुटुंबियांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रिका चौधरी ही वैद्यकीय शिक्षण घेत होती. काही महिन्यांपासून ती आपल्या मित्रासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. मात्र तिच्या या निर्णयाला कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता. कुटुंबाची बदनामी होईल, असा त्यांचा समज होता आणि याच कारणावरून त्यांनी तिच्या जीवावर बेतले. तपासात कुटुंबाने आधी तिला बेशुद्ध करण्याचा आणि नंतर आत्महत्येचा बनाव करून हत्या लपवण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे. (Breaking News)

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चंद्रिकेला दिलेल्या दुधात अल्प्राझोलम या झोपेच्या औषधाच्या 50 गोळ्या मिसळण्यात आल्या होत्या. या गोळ्या कशा द्यायच्या याबाबत दोन स्थानिक केमिस्टनी आरोपींना चुकीचा सल्ला दिला होता. तिचे वडील सेंधा चौधरी आणि काका शिवराम चौधरी यांनी दहा पाकिटे गोळ्या खरेदी केल्या आणि त्या दुधात मिसळल्या. चंद्रिका बेशुद्ध पडेपर्यंत त्यांनी वाट पाहिली. ती कोसळताच ओढणीने तिचा गळा आवळून हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह पंख्याला टांगून आत्महत्येचा आभास निर्माण करण्यात आला. समाजात वाईट बोलले जाईल या भीतीने तिचे अंत्यसंस्कारही 25 जूनच्या पहाटे घाईत करण्यात आले.
मे महिन्यात चंद्रिका आपल्या पार्टनर हरेशसोबत पळून गेली होती. त्यानंतर नातेवाईक आणि स्थानिक पोलिसांनी 12 जूनला राजस्थानातून त्यांना शोधले. हरेशला एका जुन्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आणि चंद्रिकेला घरी आणण्यात आले. त्यानंतर तिच्यावर आणखी दबाव वाढवण्यात आला. तपासात पोलिसांना 17 जूनला हरेशला पाठवलेला चंद्रिकेचा इंस्टाग्राम मेसेज मिळाला. त्यात तिने “मला घेऊन जा, तू आला नाहीस तर हे मला मारतील” असे लिहिले होते. हा मेसेज या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा मानला जातो. हरेशने तिच्या सुरक्षिततेसाठी गुजरात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टात चंद्रिकेला 27 जूनला हजर करायचे होते. पण त्याआधीच कुटुंबीयांनी तिचा ‘नैसर्गिक मृत्यू’ झाल्याचे सांगून पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. सखोल तपासानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला आणि चंद्रिकाचे वडील आणि काका यांना अटक केली आहे.






