मुंबई : सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरू असल्याने सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, या घसरणीमागे नेमकी कोणती कारणे आहेत आणि आगामी काळात सोन्याचे भाव आणखी कमी होणार की पुन्हा वाढणार, याबाबत चर्चा सुरू आहे. त्याचवेळी सोन्यात चिनी बनावटीच्या पावडरची भेसळ होत असल्याच्या चर्चेने ग्राहकांच्या चिंतेत भर घातली आहे.

सोन्याच्या किमती कमी होण्यामागे जागतिक बाजारातील घडामोडी महत्त्वाच्या ठरत आहेत. डॉलरची किंमत वाढली की आंतरराष्ट्रीय बाजारात इतर देशांना सोने खरेदी करणे तुलनेने महाग पडते. परिणामी मागणी घटण्याची शक्यता असते. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे व्याजदरविषयक निर्णय, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव तसेच जागतिक आर्थिक परिस्थितीचाही सोन्याच्या बाजारावर परिणाम होत आहे.
याशिवाय, मोठ्या गुंतवणूकदारांकडून खरेदी कमी झाल्याने सोन्यासह चांदीच्या दरांवरही परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सोन्यात रेनियम पावडर मिसळून वजन वाढवले जात असल्याची चर्चा बाजारात सुरू आहे. ही पावडर वापरल्यामुळे सोन्याच्या वजनात बदल होऊ शकतो, असे दावे केले जात आहेत. मात्र, त्याचा शुद्धता आणि कॅरेटवर नेमका किती परिणाम होतो, याबाबत स्पष्टता आवश्यक आहे.

दरम्यान, चीनमधून आयात होणाऱ्या रेनियम पावडरसोबत रूथेनियम, इरिडियम आणि ऑस्मियम यांसारख्या वजनदार धातूंचा वापर सोन्यात भेसळ करण्यासाठी केला जात असल्याचे सांगितले जात आहे. या धातूंचे वजन आणि घनता सोन्याच्या जवळपास किंवा त्यापेक्षा जास्त असल्यामुळे पारंपरिक तपासणी यंत्रांना ही भेसळ शोधणे अवघड ठरू शकते. या धक्कादायक प्रकारामुळे अनेकांनी सोनं खरेदीकडे पाठ फिरवली असून यामुळे दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.
ग्राहकांनी स्वस्त दर पाहून घाईने खरेदी न करता हॉलमार्क, कॅरेट आणि वजनाची खात्री करावी. प्रमाणित दागिने खरेदी करून पावती घेणेही महत्त्वाचे आहे.






