भुवनेश्वर : NEET पेपर लीक प्रकरण आणि त्यानंतर झालेल्या विद्यार्थी आंदोलनांवर माजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विद्यार्थी आंदोलनाच्या काळात काही लोकांनी ‘Gen Z’ तरुणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच, शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली होती, असा दावाही प्रधान यांनी केला.

शिक्षणमंत्री पद सोडल्यानंतर सुमारे 2 आठवड्यांनी प्रधान यांनी या विषयावर सार्वजनिकपणे भाष्य केले. भुवनेश्वर येथील जीएम युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. दिल्लीतील जंतर-मंतरवर NEET संदर्भात विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाल्यानंतर 25 जुलै रोजी त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

तरुण पिढीबाबत बोलताना प्रधान यांनी ‘Gen Z’ ही भारताचीच मुले असल्याचे सांगितले. या पिढीच्या स्वतःच्या अपेक्षा आणि महत्त्वाकांक्षा आहेत. भविष्यात भारताला जागतिक पातळीवर पुढे नेण्यात तरुणांची मोठी भूमिका असेल, असे त्यांनी नमूद केले.

मंत्रिपदापेक्षा देशातील तरुणांचे भविष्य आणि आपली जबाबदारी अधिक महत्त्वाची असल्याचेही प्रधान यांनी सांगितले. त्यामुळे आपण स्वतःहून पंतप्रधानांकडे राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती, असा दावा त्यांनी केला.
निदर्शनांवर प्रतिक्रिया देताना प्रधान यांनी आपण शेतकऱ्याचा मुलगा असून ओडिशाच्या जनतेची मान खाली जाईल असे कोणतेही काम केले नसल्याचे म्हटले. आपली प्रतिमा खराब करण्यासाठी तरुणांचा वापर करून राजकीय आंदोलने घडवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.







