बेंगळुरू: बेंगळुरूमधून एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. वृद्ध आणि आजारी आईला स्वतःच्या मुलाने चौथ्या मजल्यावरून खाली ढकलून हत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना आरआर नगर परिसरातील बीईएमएल लेआउटमध्ये रविवारी दुपारच्या सुमारास घडली. मृत महिलेचे नाव सवितराम्मा (वय 72) असे असून त्या मागील 4 ते 5 वर्षांपासून स्ट्रोकमुळे अंथरुणाला खिळल्या होत्या. त्यांच्या प्रकृतीमुळे त्या पूर्णपणे इतरांवर अवलंबून होत्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सवितराम्मा यांचा 42 वर्षीय मुलगा वेंकटेश यानेच हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्याने आपल्या आईला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली ढकलले. या घटनेत त्या गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यूमुखी पडल्या.
तपासादरम्यान असेही समोर आले आहे की, आईच्या दीर्घ आजारपणामुळे वेंकटेश मानसिकदृष्ट्या त्रस्त झाला होता. सततची जबाबदारी आणि ताण यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी वेंकटेशला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. घटनेच्या वेळी नेमके काय घडले आणि कोणत्या परिस्थितीत हे कृत्य झाले याचा तपास सध्या सुरू आहे.






