पुणे: शारदीय नवरात्र उत्सवाला यंदा 11 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या काळात देवीच्या 9 स्वरूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते. या 9 दिवसांमध्ये विविध रंगांना देखील विशेष महत्त्व दिले जाते. प्रत्येक दिवशी एका विशिष्ट रंगाचे कपडे परिधान करण्याची परंपरा अनेक ठिकाणी पाहायला मिळते.

ज्योतिषी तृप्ती भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 ऑक्टोबर रोजी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाईल. या दिवशी नारंगी रंग शुभ मानला जातो. 12 ऑक्टोबरला ब्रह्मचारिणी देवीची आराधना असून पांढरा रंग शांतता आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो.

13 ऑक्टोबरला चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. या दिवशी लाल रंगाला महत्त्व असून तो शौर्य आणि पराक्रमाशी जोडला जातो. 14 ऑक्टोबरला कूष्मांडा देवीची पूजा असून निळा रंग स्थैर्य आणि विशालतेचे प्रतीक मानला जातो. 15 ऑक्टोबरला स्कंदमातेची आराधना केली जाईल आणि पिवळा रंग आनंद व आशावादाशी संबंधित मानला जातो.

नवरात्रीच्या पुढील दिवसांमध्येही रंगांची ही परंपरा कायम राहते. 16 ऑक्टोबरला कात्यायनी देवीसाठी हिरवा रंग, 17 ऑक्टोबरला कालरात्री देवीसाठी राखाडी रंग आणि 18 ऑक्टोबरला महागौरी देवीच्या पूजेसाठी जांभळा रंग सांगितला जातो. हिरवा रंग वाढ आणि समृद्धी, राखाडी रंग संयम व समतोल, तर जांभळा रंग अध्यात्म आणि प्रगतीशी जोडला जातो.
19 ऑक्टोबरला महानवमी असून सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाईल. या दिवशी मोरपंखी हिरवा रंग सांगितला जातो. हा रंग ताजेपणा, सुसंवाद आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो.
मात्र, नवरात्रीच्या रंगांबाबत धर्मशास्त्रात कोणतेही कठोर किंवा अधिकृत बंधन नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भाविकांनी आवडीनुसार इतर रंगांचे कपडेही परिधान करू शकतात. हे रंग नवग्रहांच्या गणिताशी संबंधित असल्याचे ज्योतिषीय मत आहे.






