Mumbai Pune Expressway: मुंबई : मुंबई आणि पुणे (Mumbai And Pune) दरम्यानच्या वाढत्या वाहतुक कोडींचा विचार करून प्रस्तावित तिसऱ्या नवीन द्रुतगती महामार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया आता पूर्ण झाली असून येत्या एका महिन्यात त्याचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी माहिती समोर आली आहे. पहिल्या टप्प्यात पागोटे म्हणजे अटल सेतू ते कर्जत जवळील चौकपर्यंतच्या मार्गाचे काम प्राधान्याने हाती घेतले जाणार आहे. सध्याच्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या नवीन मार्गाची घोषणा केली होती.

हा नवीन महामार्ग पूर्णपणे वेगळ्या आखणीनुसार तयार केला जाणार आहे. लोणावळा ते खोपोली दरम्यान या रस्त्यासाठी नवीन बोगदे आणि उड्डाणपूल बांधले जातील. विशेष म्हणजे हा रस्ता लोणावळ्याहून पवना खोरे आणि मुळशी मार्गे खेड शिवापूर येथील शिवरे गावात रिंग रोडला जोडला जाणार आहे. यामुळे सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या दिशेला जाणाऱ्या प्रवाशांना पुण्यातील वाहतूक कोंडीत न अडकता थेट प्रवास करणे शक्य होईल. सध्या हा रस्ता 8 पदरी केला जाणार असला, तरी भविष्यातील गरज ओळखून 16 पदरी विस्तारासाठी 100 मीटर जागा संपादित केली जाणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या मार्गाचा सविस्तर आराखडा तयार केला असून भूसंपादनाचे कामही बहुतांशी पूर्ण झाले आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव देखील केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. या नवीन तिसऱ्या पर्यायामुळे मुंबई आणि पुणे प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे.






