Mumbai Cyber Crime : मुंबई : मुंबईत ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Fraud) घटना दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. अशाच एका प्रकारात मालाड परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाला फसवून 1.75 लाख रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुशीलकुमार कुलश्रेष्ठ (वय 67) हे आपल्या कुटुंबासह मालाड पश्चिम भागात राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअॅप कॉल आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले आणि त्यांच्या मुलाला एका गुन्ह्यात अटक केल्याचा बनाव केला. तसेच तातडीने पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही देण्यात आली.
अचानक आलेल्या या फोनमुळे घाबरलेल्या कुलश्रेष्ठ यांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे जमा केले. त्यांनी बँकेतून 1 लाख 50 हजार रुपये काढले आणि घरातील 25 हजार रुपये मिळवून एकूण 1 लाख 75 हजार रुपये संबंधित खात्यांमध्ये पाठवले. काही वेळानंतर ही बाब कुटुंबीयांना सांगितल्यावर मुलाशी संपर्क साधण्यात आला. त्यावेळी तो सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
यानंतर कुलश्रेष्ठ यांनी तातडीने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी संबंधित खात्यांची माहिती गोळा करत आरोपींचा शोध सुरू केला आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी अनोळखी कॉलवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही खात्री न करता पैसे पाठवू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.







