मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Maharashtra Politics) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत (Mahayuti) निर्माण झालेली नाराजी आता (Devendra Fadanavis) उघडपणे दिसत आहे. बुधवारी झालेल्या (Eknath Shinde) राज्य मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेना शिंदे गटातील सर्व मंत्री गैरहजर राहिल्याने या नाराजीची ठिणगी स्पष्टपणे जाणवली. बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांसह नाराजीची कारणं मांडली. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असली तरी परिस्थिती पूर्णपणे सुरळीत झालेली नाही. कारण, दोन दिवसांनंतरच एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाले आणि त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी आणि महायुतीतील समन्वय याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. (Maharashtra Breaking News)

एकनाथ शिंदे दिल्लीतील वरिष्ठ भाजप नेत्यांशीही चर्चा करणार असून त्यानंतर बिहारमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत शिंदेंनी दोन प्रचार सभा घेतल्या होत्या. त्यामुळे एनडीए आघाडीच्या विजयानंतर शुभेच्छा देण्यासाठी ते बिहारला जाण्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीस-अजित पवारांची बैठक (Devendra Fdanavis)
दरम्यान, एकनाथ शिंदे दिल्लीला गेल्याचं समजताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्षा निवासस्थानी तातडीची बैठक घेतली. शिवसेना शिंदे गटात वाढत चाललेली नाराजी दूर करण्यासाठी कोणती पाऊलं उचलायची यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. नाराजी आणखी वाढली तर त्याचे गंभीर राजकीय परिणाम होऊ शकतात, त्यामुळे परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न सुरू आहेत. महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये सर्व काही ‘आलबेल’ नसल्याचं या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे.

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी मात्र नाराजीच्या चर्चांना वेगळा अर्थ नसल्याचं सांगितले. कुटुंबात वादविवाद होतच असतात आणि आम्ही आमच्या भावना मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या आहेत, असं ते म्हणाले. निवडणुका आणि पक्ष प्रवेशांमुळे काही गैरसमज निर्माण झाले होते. महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकमेकांचे नेते किंवा पदाधिकारी आपल्या पक्षात न घेण्याचा निर्णय घेतला असून याची अंमलबजावणी उद्यापासून होईल, अशी माहिती त्यांनी दिली.








