मुंबई: महाराष्ट्राचे राजकारण (Maharshtra Political) सध्या एका अत्यंत संवेदनशील आणि वादळी वळणावर आहे. अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यातून महाराष्ट्र सावरत असतानाच, सुनेत्रा पवार यांचा झालेला शपथविधी राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फोडून गेला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून या संपूर्ण घडामोडींवर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढण्यात आले असून, यामागे भाजपचा ‘शत-प्रतिशत’ अजेंडा असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे.

अग्रलेखातील सर्वात महत्त्वाचा खुलासा म्हणजे दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची प्रक्रिया आहे. अजित पवार यांना शरद पवारांविषयी असलेल्या आदरामुळे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली सुरू होत्या. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर यावर शिक्कामोर्तब होणार होते, पण नियतीने डाव उलटा फिरवला आणि अजित पवारच निघून गेले. आता हे विलीनीकरण रोखण्यात प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि भाजपचे सर्वोच्च नेतृत्व यांचाच स्वार्थ असल्याचा आरोप अग्रलेखात केला आहे.
सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणे, हा कर्तृत्वाचा भाग नसून राजकीय सोयीचा भाग असल्याचे ‘सामना’ने म्हटले आहे. अजित पवारांनंतर पक्षात निर्माण झालेली पोकळी आणि प्रफुल पटेल-सुनील तटकरे यांच्यातील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्रीपद दिले. मात्र, या सत्तेच्या नौकेला देवेंद्र फडणवीस यांचे इंजिन असून त्याचा रिमोटही त्यांच्याच हातात आहे, असा टोला लगावण्यात आला आहे.
अजित पवारांच्या जाण्याने पवार कुटुंबातील आणि पर्यायाने राज्याच्या राजकारणातील गुंता अधिक वाढला आहे. हा गुंता सुटू नये, यातच अनेकांचे राजकीय हितसंबंध दडले आहेत. सुनेत्रा पवार यांनी जर स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले, तर पक्षात त्यांना घरच्यांकडूनच (पटेल, तटकरे, भुजबळ) विरोधाचा सामना करावा लागेल, असा इशाराही या अग्रलेखातून देण्यात आला आहे.







