Leopard News : पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर अशा भागांत बिबट्यांच्या दहशतीनं शेतकरी भरदिवसा घराबाहेर पडायला घाबरतायतच, आता तर मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतही बिबट्या मोकाट फिरताना दिसलाय. या भागात बिबट्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होतोय, त्यामुळे गोरेगावकरांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे.

दिंडोशी विधानसभा क्षेत्रातल्या न्यू दिंडोशी रॉयल हिल्स सोसायटीमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून रात्री-अपरात्री बिबट्या येताना सीसीटीव्हीत कैद झालाय. आधी इथे संरक्षणासाठी जाळ्या बसवल्या होत्या, पण बिबट्या त्या जाळ्या ओलांडून आत येतोय! असं तिथल्या रहिवाश्यांचं म्हणणं आहे.
या सगळ्या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली म्हणूनच आमदार सुनील प्रभू यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र पाठवून तातडीने उपाययोजना करायला सांगितलंय.
सुनील प्रभूंचे गणेश नाईकांना लिहिलं पत्र
सुनील प्रभू यांनी गणेश नाईक यांना पत्र लिहीलं या पत्रात त्यांनी काही महत्वाच्या मागण्या केल्या आहेत.
• गोरेगावात बिबट्यांचा वावर वाढलाय, लोक दहशतीत जगतायत.
• म्हाडाची परवानगी घेऊन 26 मे 2023 रोजी संरक्षण जाळ्या बसवल्या होत्या, पण त्याचा काही उपयोग होत नाहीये.
• उद्यानाच्या सहा फूट उंच जाळ्या सहज उड्या मारून बिबटे सोसायट्यांत शिरतायत.
• नागरिकांना आता दिवसा ढवळ्या बाहेर पडायलाही भीती वाटते.
त्यामुळे संभाव्य हल्ले टाळण्यासाठी, जीवितहानी होऊ नये म्हणून आणि वन्यजीवांचंही रक्षण व्हावं म्हणून त्वरीत कारवाई करा, अशी मागणी आमदारांनी पत्रातून केली आहे.







