मुंबई: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला (Ladaki Bahin Yojana) आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. विधानसभा (Devendra Fadanavis) निवडणुकीच्या काही महिने आधी सुरू झालेली ही योजना महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरली. या योजनेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले होते. महायुतीने 232 जागांवर विजय मिळवला, तर महाविकास आघाडीला फक्त 50 जागांवर समाधान मानावे लागले. या विजयात महिला मतदारांचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांनी लाडकी बहीण सन्मान निधी 2100 रुपये करण्याची घोषणा केली होती, मात्र या वाढीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

सध्या या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. राज्य सरकारची ही एक महत्त्वाकांक्षी योजना मानली जाते. आता या योजनेचे एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे बोलताना विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले.
विरोधक सातत्याने ही योजना बंद होणार असल्याचे दावे करत आहेत. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, 5 डिसेंबरला आमच्या सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. अनेकांनी निवडणूक जिंकल्यावर ही योजना बंद होईल असे सांगितले, पण आज एक वर्ष होऊनही योजना सुरूच आहे आणि पुढेही सुरू राहणार आहे. यावेळी त्यांनी सरकार आता लाडकी बहिणींना पुढे आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार असून त्यांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. याअगोदरही एका सभेत त्यांनी आणखी 50 लाख महिलांना लखपती करण्याची गरज असल्याचे म्हटले होते.







