पालघर: पालघर जिल्ह्यातील बिबलधर गावात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. एका नराधमाने त्याच्याच होणाऱ्या पत्नीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या घटनेनंतर काही तासांतच आरोपीला अटक केली असून, या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

शारीरिक संबंधांना नकार दिल्याने केली हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी मुलीचे आई-वडील शेतात गेले होते. त्याच वेळी तिचा होणारा नवरा तिच्या घरी आला. त्याने मुलीवर शारीरिक संबंधांसाठी दबाव आणला, मात्र तिने स्पष्ट नकार दिला. या रागातून आरोपीने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिचा गळा दाबून हत्या केली.

ही घटना घडल्यानंतर आरोपी गावाजवळील जंगलात पळून गेला. संध्याकाळी मुलीचे कुटुंबीय घरी परतले, तेव्हा त्यांना मुलीचा मृतदेह दिसला. मुलीच्या आईने लगेच पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत काही तासांतच आरोपीला जंगलातून पकडले. सध्या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.







