Crime News: टिटवाळा : टिटवाळ्यातील गोवेली रोडवर रक्ताने माखलेली उबेर कार सापडल्याच्या प्रकरणाचा उलगडा झाला असून एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यानेच चालकाची हत्या केल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आदर्श भालेराव असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. त्याने पुण्याला जाण्यासाठी नासीर अन्सारी यांची उबेर कार बुक केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी पुण्याला जात होता. रात्रीच्या प्रवासादरम्यान गाडी गणेश खिंड परिसरात आली असता चालक नासीरने गाडी थांबवली. चालकाने चाकूचा धाक दाखवून आदर्शकडे पैशांची मागणी केली. यावेळी दोघांमध्ये मोठी झटापट झाली. या झटापटीत चालकाच्या हातातील चाकू आदर्शच्या हाती आला आणि नासीरचा गळा चिरला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर घाबरलेल्या आदर्शने नासीरचा मृतदेह तिथेच टाकून गाडी टिटवाळ्याला आणली आणि गोवेली रस्त्यावर सोडून तो पसार झाला.
टिटवाळा पोलीस आणि ठाणे स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी उबेर कंपनीकडून प्रवाशाची माहिती मिळवली आणि आदर्शला ताब्यात घेतले. तपासादरम्यान असे समोर आले की, मृत चालक नासीरला पैशांची गरज होती आणि त्याने अनेक लोकांकडून पैसे मागितले होते. आदर्शचा हत्येचा कोणताही पूर्वहेतू नव्हता, परंतु स्वसंरक्षणासाठी केलेल्या झटापटीत हा अनर्थ घडला. या घटनेमुळे एका तरुण विद्यार्थ्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. या प्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.







