नवी मुंबई: नवी मुंबई येथील माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. काळी जादू दूर करण्याच्या बहाण्याने एका भोंदूबाबाने चक्क मायलेकीवर लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. अब्दुल रशीद उर्फ ‘बाबाजान’ असे या नराधमाचे नाव असून, त्याच्या विकृतीच्या कहाण्या ऐकून पोलीसही चक्रावून गेले आहेत.

आरोपी अब्दुल रशीद हा लोकांच्या कमकुवत मानसिकतेचा फायदा घ्यायचा. कौटुंबिक कलह, आर्थिक चणचण किंवा शारीरिक व्याधींनी त्रस्त असलेल्या महिलांना तो आपल्या जाळ्यात ओढायचा. “तुमच्यावर कुणीतरी करणी केली आहे,” किंवा “घरावर काळी जादू आहे,” अशी भीती तो महिलांना दाखवायचा. सांताक्रूझमधील एका महिलेला आणि तिच्या तरुण मुलीलाही त्याने असेच सांगत जाळ्यात अडकवले.
तक्रारीनुसार, या भोंदूबाबाने मायलेकीला काळी जादू उतरवण्यासाठी खालापूर येथील एका निर्जन फार्महाऊसवर बोलावले. मध्यरात्री ‘अघोरी पूजा’ करण्याच्या बहाण्याने त्याने दोघींना विवस्त्र होण्यास भाग पाडले. विरोध केला तर ‘जीवे मारण्याची’ किंवा ‘जादूटोण्याने भस्म करण्याची’ धमकी देऊन त्याने या दोघींवर अत्याचार केला. दरम्यान, पोलिसांनी आरोपी अब्दुल रशीद विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.







