पिंपरी : नातेवाईक असलेले दोन अल्पवयीन मुले खुनाच्या गुन्ह्यात बालसुधारगृहातून बाहेर आल्यानंतर त्याबाबत समाजमाध्यमावर ‘स्टेटस’ ठेवल्याच्या रागातून तिघांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना तळेगाव दाभाडे येथे घडली. मंगळवारी घडलेल्या या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी जखमी तरुणाने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणातून ऑगस्ट महिन्यात आठ जणांनी एका तरुणावर कोयत्याने वार करून त्याचा खून केला होता. या प्रकरणात फिर्यादीचे दोन अल्पवयीन नातेवाईक आरोपी होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवले होते. हे दोघे 19 ऑक्टोबर रोजी बालसुधारगृहातून बाहेर आले. त्यानंतर फिर्यादीने याबाबत समाजमाध्यमावर ‘स्टेटस’ ठेवले होते.

दरम्यान, मंगळवारी फिर्यादी कपड्याच्या दुकानात काम करत असताना तिघे आरोपी तेथे आले. त्यातील एकाने पॅन्ट खरेदी करायची असल्याचे सांगितले. फिर्यादी पॅन्ट दाखवण्यासाठी मागे वळताच तिघांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. घटनेचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.






