पुणे : दिल्ली विमानतळावर कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जंतरमंतर येथे होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली. या घटनेमुळे सीजेपी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, देशभर या कारवाईचा निषेध केला जात आहे. या कारवाईवर अभिजीत यांच्या आई-वडिलांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

वडील भगवानराव दीपके म्हणाले की, अभिजीतने कोणताही गुन्हा केलेला नाही. दिल्ली पोलीस अत्यंत चुकीच्या पद्धतीने वागत असून ही थेट हुकूमशाही आहे. तर आई अनिता दीपके यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, देशासाठी चांगलं काम करणाऱ्या तरुणांना सरकार पकडत आहे, मात्र खऱ्या गुन्हेगारांवर कोणतीही कारवाई होत नाही.अभिजित आणि सहकारी चांगले काम करत आहेत. तुम्ही बलात्कारी लोकांना का अटक करत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान दीपके हे आंदोलनासाठी जात असताना त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक का दिली जात आहे, असा सवाल नागरिक विचारत आहेत.दीपके यांच्या अटकेनंतर छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन परिसरातील सुरक्षेचा आढावा घेतला. तसेच कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून दीपके यांच्या घराकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी केली जात आहे.

दरम्यान, पोलिसांकडून केवळ दिल्लीतच नव्हे तर इतर राज्यांतही सीजेपी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. जंतरमंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात जमण्यापूर्वीच महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना सध्या अंधेरी येथील डी. एन. नगर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. अशा प्रकारे देशभरात या आंदोलनाशी जोडलेल्या कार्यकर्त्यांवर पोलीस यंत्रणेकडून कडक कारवाई केली जात आहे.







