Beed: बीड जिल्ह्यातून एक अनोखी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे गावगावात चर्चा सुरु झाली आहे. बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात एक कार अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचे खूप नुकसान झाले परंतु नशीबानं या कारमधील सर्व प्रवाशी सुखरुप वाचले. ही घटना एखाद्या सिनेमातील सीन असावा अशी चर्चा लोकांमध्ये रंगली आहे. या घटनेमागे नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात,
बीड मध्ये सोमवारी पहाटे एका कारमधून गर्भवती महिला प्रवास करत होती. अचानक महिलेला वेदना सुरु झाल्या. कारमध्येच तीची प्रसूती झाली. प्रसतीदरम्यान महिलेला अधिक रक्तस्राव झाला. हे रक्तस्राव पाहून कार चालकाला चक्कर आली आणि कार अनियंत्रित झाली. अनियंत्रित कार थेट पुढे जाऊन एका खड्डात पडली. सुदैवाने कारमधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.
सुत्रांच्या माहितीनुसार, कॅनाल रोड येथे राहणाऱ्या महिलेला पहाटे प्रसतीच्या वेदना सुरु झाल्या होत्या. त्यामुळे घरातल्या सदस्यांनी तिला रुग्णालयात नेण्यासाठी कारची व्यवस्था केली. रुग्णालयात पोहोचण्याआधीच कारमध्येच प्रसूती झाली. त्यानंतर डॉक्टर उपलब्ध नसल्याने कुटुंबीयांना जिल्हा रुग्णालयात जाण्यास सांगितले. जिल्ह्या रुग्णालयात जाताना हा अपघात घडला

कारमध्ये बाळ, माता, इतर दोन महिला आणि चालक असे पाच जण होते. महिलेचे प्रसुतीदरम्यानचे रक्त पाहून कार चालकाला चक्कर आली. कार अनियंत्रित झाल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात जाऊन पडली. या भीषण अपघाताचा आवाज ऐकताच, नागरिकांनी धाव घेतली आणि तात्काळ मदतीसाठी हात पुढे केला. अपघातग्रस्त कारमधून सर्वांना सुखरुप बाहेर काढले.
पुढील उपचारासाठी नागरिकांनी बाळ आणि माताला खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टर दोघांवार उपचार करत असल्याची माहिती समोर येते. या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.






