पुणे : केंद्र सरकारची ‘पीएम किसान सन्मान निधी योजना’ देशातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.. नुकताच 20 जून रोजी योजनेचा 23 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आला होता. आता सर्व शेतकरी पुढील म्हणजेच 24 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

सर्वसाधारण अंदाजानुसार, पीएम किसान योजनेचा 24 वा हप्ता ऑक्टोबर 2026 च्या उत्तरार्धात किंवा नोव्हेंबर 2026 च्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकतो. साधारणपणे 20 ऑक्टोबरपर्यंत हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, केंद्र सरकारकडून अद्याप याची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

याच्या नवीन नियमांनुसार पुढील हप्त्याचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना ‘ॲग्रीस्टॅक’डिजिटल प्रणालीमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. या प्रणालीद्वारे प्रत्येक शेतकऱ्याला एक ‘युनिक फार्मर आयडी’ दिला जातो. याद्वारे शासकीय योजना, पीक विमा आणि विविध अनुदानांचे लाभ घेणे सोपे होणार आहे.
नोंदणीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे:
मोबाईल नंबरशी लिंक असलेले आधार कार्ड
जमिनीचा चालू 7/12 उतारा आणि 8-अ पत्रक
बँक पासबुकचा तपशील
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचा पुढील हप्ता थांबू शकतो. तसेच बँक खात्याला आधार लिंक नसणे, जमिनीची पडताळणी अपूर्ण असणे किंवा बँक खात्यावरील व आधारवरील नावांमध्ये तफावत असणे यामुळे देखील पैसे जमा होण्यास अडचण येऊ शकते.
जर तुम्हाला मागील हप्ता मिळाला नसेल, तर त्वरित ‘pmkisan.gov.in’ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तेथे ‘Know Your Status’ या पर्यायावर क्लिक करून तुमचे स्टेटस तपासा. जर स्टेटसमध्ये ‘e-KYC’ किंवा ‘Land Seeding’ समोर ‘No’ दिसत असेल, तर जवळच्या ग्राहक सेवा केंद्रात (CSC) जाऊन माहिती अपडेट करा. तुम्ही स्वतः देखील पोर्टलवर लॉगइन करून आधार आणि बँकेचा योग्य तपशील दुरुस्त करू शकता.






