जळगाव : जामनेर तालुक्यातील पहूरजवळ असलेल्या गोगडी धरणात बोट उलटल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत दोन तरुणी, त्यांचा भाऊ आणि बोटचालक असे चौघे धरणाच्या पाण्यात अडकले. तब्बल तासभर बोटीचा आधार घेत त्यांनी जीव वाचवण्यासाठी संघर्ष केला. अखेर परिसरातील नागरिकांनी वेळीच धाव घेतल्याने चौघांचेही प्राण वाचले आणि मोठी जीवितहानी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन तरुणी, त्यांचा भाऊ आणि बोटचालक हे चौघे बोटीतून धरणाच्या दुसऱ्या बाजूला जात होते. धरणाच्या मध्यभागी पोहोचल्यानंतर अचानक बोट उलटली. त्यामुळे चौघेही पाण्यात पडले. त्यांनी उलटलेल्या बोटीचा आधार घेत मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. जवळपास तासभर ते पाण्यात जीव वाचवण्यासाठी संघर्ष करत होते.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. चार तरुणांनी पाण्यात उतरून ट्यूब आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या जॅकेटच्या मदतीने चौघांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. अखेर चौघांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.

घटनेची माहिती मिळताच पहूर पेठचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाकडूनही युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले. नायब तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
नागरिकांच्या तत्परतेमुळे चारही जणांचे प्राण वाचल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.






