पुणे :पुण्यातील पोलीस आयुक्तांच्या बंगल्याबाहेर एका पोलीस कर्मचाऱ्याने गोंधळ घातल्याची घटना उघडकीस आली असून, यामुळे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अमोल भिसे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी मद्यधुंद अवस्थेत चारचाकी गाडी घेऊन तो थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचला आणि तेथे घोषणाबाजी करत शिवीगाळ करू लागला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अमोल भिसे याची बदली करण्यात आली होती. मात्र, ही बदली त्याच्या पसंतीच्या ठिकाणी न झाल्याने तो कमालीचा नाराज होता. याच संतापातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात संबंधित कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या घटनेने पोलीस दलातील अंतर्गत असंतोष आणि बदल्यांमधील कथित अस्वस्थता चव्हाट्यावर आणली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कार्यकाळात कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि शिस्तभंगाच्या कारवायांबाबत भेदभाव होत असल्याची चर्चा सध्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. पोलीस दलातील वसुलीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी यापूर्वी काही कर्मचाऱ्यांवर कारवाई करून त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. परंतु, तरीही काही भागांत असे प्रकार सुरूच असल्याचे चित्र आहे.

पोलीस दलासारख्या अत्यंत शिस्तबद्ध क्षेत्रात कर्मचाऱ्याने थेट आयुक्तांच्या बंगल्यासमोर जाऊन विरोध दर्शवणे ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. एका बाजूला सामान्य कर्मचाऱ्यांवर क्षुल्लक कारणांवरून कठोर कारवाई केली जाते, तर दुसऱ्या बाजूला वरिष्ठ किंवा विशिष्ट अधिकाऱ्यांना वेगळा न्याय दिला जातो, असा सूर कर्मचाऱ्यांमध्ये उमटत आहे. या घटनेमुळे पुण्यातील पोलीस प्रशासनाच्या कारभारावर आणि कर्मचाऱ्यांच्या तक्रारी निवारण व्यवस्थेवर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.







