पुणे : राज्यात विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. विशेषतः पुण्यातील शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून राजकीय वातावरण तापले असून, या जागेसाठी महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांनी पूर्ण ताकद पणाला लावली आहे.महायुतीमध्ये मात्र या पुणे शिक्षक मतदारसंघावरचा तिढा सुटलेला नाही.

पुणे शिक्षक मतदारसंघावरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही घटक पक्षांनी या जागेवर आपला दावा ठोकला आहे. एकाच जागेसाठी तिन्ही पक्ष आग्रही असल्याने उमेदवारी पुढील चर्चेसाठी वरिष्ठ नेत्यांकडे पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.इतर जागांबाबतची राजकीय समीकरणे निश्चित होत असल्याचे दिसून येत आहे. नागपूर आणि पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपकडे, तर छत्रपती संभाजीनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय अमरावती शिक्षक मतदारसंघाची जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळण्याचे जवळपास ठरले आहे. असे असले तरी, पुण्यातील शिक्षक मतदारसंघाचा अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहे.

पुण्याच्या शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. पुण्याची शिक्षक मतदार संघाची जागा शिवसेनेला मिळावी यासाठी शिंदे सेनेचे दोन नेते प्रचंड आग्रही आहेत. दोघांनी या जागेवर दावा ठोकला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय सानप आणि आरोग्यदूत मंगेश चिवटे पुण्याच्या जागेसाठी आग्रही आहेत. दोघांनीही या जागेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.भाजप ही जागा शिंदे सेनेला सहजासहजी सोडणार नसल्याचे समोर येत आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 6 ऑक्टोबर आहे. त्यामुळे वेळेचे गांभीर्य लक्षात घेता महायुतीमधील वरिष्ठ नेते लवकरात लवकर यावर तोडगा काढून जागावाटपाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.






