उरुळी कांचन : खडकवासला नवा मुठा उजवा कालव्यातून पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरात पाणी पिण्यासाठी वापरले जाते. मात्र, या कालव्याच्या शेजारी राहणारे परिसरातील पशुपालक व काही नागरिक रात्रीच्या वेळी या पाण्यात मृत गायी व म्हैस या जनावरांची लहान मृत वासरे या पाण्यात टाकून विल्हेवाट लावत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

या कालव्यात मोठ्या प्रमाणावर साचलेला प्लास्टिक कचरा, थर्माकोल आणि त्यातच तरंगणारे मृत जनावरांचे कुजलेले अवशेष व मरण पावलेली जनावरे यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे उरुळी कांचन व परिसरातील नागरिकांसह शेतकऱ्यांचे आरोग्य पुरते धोक्यात आले असून, पाटबंधारे विभागाच्या सुस्त कारभाराविरुद्ध नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नवा मुठा उजवा नवीन कालव्यातील पाण्याचा वापर पूर्व हवेलीतील 10 ते 12 गावातील नागरीकांची तहान भागवण्यासाठी व शेतीसाठी करीत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून काही बेजबाबदार आणि विकृत प्रवृत्तीचे लोक रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन मृत जनावरे कुत्रे, हॉस्टन जातीच्या गायी त्यांची वासरे गोणीत भरून किंवा थेट कालव्याच्या पाण्यात फेकून देत असल्याचे प्रकार वारंवार दिसून येत आहेत.

कुजलेल्या अवशेषांमुळे पाण्यात जिवाणू-विषाणूंची मोठ्या प्रमाणावर पैदास होत असून, डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो आणि अतिसारासारखे भयानक साथरोग पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. केवळ मृत जनावरेच नव्हे, तर उरुळी कांचन परिसरातील व्यावसायिक, विक्रेते आणि काही नर्सरी व्यावसायिक नागरिक सर्रासपणे प्लास्टिकच्या पिशव्या, थर्माकोलचे ग्लास-प्लेट्स आणि घरातील ओला-सुका कचरा कालव्यात आणून टाकत आहेत.

या कचऱ्याचे मोठे थर कालव्याच्या पुलांजवळ साचल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे तुंबला आहे. या दूषित पाण्याचा वापर उरुळी कांचन व परिसरातील गावामध्ये केला जात असून तसेच शेतीसाठी व परिसरातील विहिरींच्या पुनर्भरण प्रक्रियेसाठी होत असल्याने, भूगर्भातील पाणीही विषारी होण्याची भीती निर्माण झाली आहे.
पाटबंधारे विभाग आणि स्थानिक प्रशासन झोपलेय का?
कालव्याची झालेली ही भीषण दुरवस्था आणि पसरणारी दुर्गंधी स्थानिक नागरिकांच्या उघड्या डोळ्यांनी दिसत असताना, पाटबंधारे विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनाने मात्र याकडे पूर्णपणे डोळेझाक केली आहे. कालव्यात मृत जनावरे कुजत असताना आणि रोगराई उंबरठ्यावर आलेली असतानाही संबंधित अधिकारी जागेवरून हलत नाहीत,” असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
विकृत व्यक्तींच्या या कारस्थानामुळे पाणी प्रदूषित होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या विकृत प्रवृत्तींना पाय बंद घालणे आवश्यक आहे. कालवा परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी सजग राहून या विकृत लोकांची माहिती उरुळी कांचन पोलिसांना तथा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना माहिती द्यावी. हिंदू समाजात गाईला गोमाता म्हटले जाते. त्या मरण पावल्यानंतर त्यांचा व्यवस्था केली पाहिजे. तसेच पाटबंधारे विभागाने उपाययोजना करण्याची गरज आहे.
(संतोष कांचन, संचालक, यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊर, ता. हवेली)






