डॉ. अशोक बालगुडे

पुणे : भारताच्या संरक्षण सज्जतेला बळ देणाऱ्या स्वदेशी ‘प्रलय’ क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी गुरुवारी ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम बेटावर घेण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) ही चाचणी केली. निर्धारित उद्दिष्टे पूर्ण झाल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.
या क्षेपणास्त्राच्या विकासात पुण्यातील आयुध संशोधन आणि विकास आस्थापना (एआरडीई), उच्च ऊर्जा पदार्थ संशोधन प्रयोगशाळा (एचईएमआरएल) आणि संशोधन व विकास आस्थापना (अभियंते) या तीन संस्थांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

‘प्रलय’ हे घन इंधनावर आधारित, जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. आधुनिक दिशानियंत्रण प्रणालीमुळे उड्डाणादरम्यान मार्ग बदलण्याची त्याची क्षमता आहे. विविध प्रकारची पारंपरिक स्फोटके वाहून नेण्यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे.

या चाचणीमुळे क्षेपणास्त्राच्या वापरकर्ता मूल्यमापन प्रक्रियेला महत्त्वाचे बळ मिळाले आहे. भारतीय लष्कर आणि हवाई दलात त्याचा समावेश करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि सहभागी संस्थांचे अभिनंदन केले.







