पुणे : वृदावन येथील प्रेमानंद महाराज यांच्या केलिकुंज आश्रमाबाबत श्री कृष्ण जन्मभूमी संघर्ष ट्रस्टचे अध्यक्ष फलाहरी महाराज यांनी नुकताच एक खळबळजनक दावा केला होता. प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी आश्रमात येण्यासाठी तब्बल 5 कोटी रुपये देण्यात आले होते, असा आरोप फलाहरी महाराजांनी केला आहे.मात्र, आता विराट कोहलीच्या अधिकृत टीमने हे सर्व दावे फेटाळून लावत एक स्पष्टीकरण जारी केले आहे.

विराट कोहलीच्या प्रवक्त्याने दिलेल्या निवेदनानुसार, फलाहरी महाराजांचे सर्व आरोप पूर्णपणे खोटे, निराधार आणि वास्तवापासून दूर आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे कोणत्याही पैशांच्या देवाणघेवाणीसाठी नाही, तर प्रेमानंद महाराजांवरील अथांग श्रद्धा आणि भक्तीपोटी आश्रमाला भेट देतात. अशा प्रकारच्या बिनबुडाच्या बातम्या पसरवण्यापूर्वी प्रसारमाध्यमांनी तथ्यांची योग्य पडताळणी करावी आणि जबाबदारीने वृत्तांकन करावे, असे आवाहनही प्रवक्त्याने केले आहे.

फलाहरी महाराजांनी असाही आरोप केला होता की, राजस्थानमधील एका कंपनीने या रकमेचा व्यवहार करून विराटला आश्रमात आणले. सध्या याच कंपनीचे काही लोक संतांचा मुखवटा घालून आश्रमात शिरले असून तेथे मालमत्तेचे व्यवहार करत आहेत. या भूमाफियांपासून प्रेमानंद महाराजांनी सावध राहावे, असा सल्ला फलाहरी महाराजांनी दिला आहे.

प्रेमानंद महाराजांचे कार्य सनातन धर्मासाठी अत्यंत मोलाचे आहे, असे सांगत फलाहरी महाराजांनी महाराजांच्या आरोग्यासाठी स्वतःची किडनी दान करण्याची तयारीही दर्शवली आहे. प्रेमानंद महाराजांचे शिष्य रसिक दुलारी शरण उर्फ दीपक लोधी यांच्या निधनानंतर केलिकुंज आश्रम आधीच चर्चेत आला होता. त्यातच फलाहरी महाराजांच्या या वक्तव्यांमुळे नवा वाद निर्माण झाला होता, ज्यावर अखेर विराट कोहलीच्या टीमने पडदा टाकला आहे







