पुणे : राज्यातील आगामी विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघावरून भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागावाटपाबाबत मोठी रस्सीखेच सुरू आहे . वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्याचे समोर आले आहे.या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार सुनील टिंगरे यांनी सोशल मीडियाद्वारे आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “पुणे पदवीधर मतदारसंघ हा मूळचा राष्ट्रवादीचाच आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच ही निवडणूक लढवणार.” अजित पवार यांच्या निधनानंतर ही पहिलीच निवडणूक होत असल्याने महायुतीतील इतर घटक पक्षांनी ही जागा राष्ट्रवादीसाठी सोडायला हवी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

महायुतीतील संभाव्य जागावाटप सूत्र:

पुणे शिक्षक: भाजप
पुणे पदवीधर: भाजप
नागपूर पदवीधर: भाजप
अमरावती पदवीधर: शिवसेना (शिंदे गट)
छत्रपती संभाजीनगर: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा भाजपकडे गेल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते प्रताप उर्फ भैय्या माने हे नाराज झाले आहेत. पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली.
यावर प्रतिक्रिया देताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुती धर्म पाळणार असल्याचे स्पष्ट केले. “भैय्या माने यांच्या या भूमिकेनंतर आजपासून माझा आणि त्यांचा कोणताही संबंध उरलेला नाही,” असे सांगत मुश्रीफ यांनी आपण भाजप उमेदवाराच्या पाठीशी ठाम राहणार असल्याचे जाहीर केले. यामुळे पुणे पदवीधर निवडणुकीत महायुतीसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे






