
पुणे: वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे अलीकडेच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वरिष्ठ अधिकारी जालंदर सुपेकर यांच्यावर भ्रष्टाचार आणि खंडणीचे आरोप लावण्यात आले आहेत. सुपेकर यांच्यावर दोन कैद्यांकडून जामीन मिळवण्यासाठी तब्बल ५५० कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. आरोपी नानासाहेब गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली होती. असा आरोप वकील निवृत्ती कराड यांनी केला आहे.

सुपेकर आणि पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गायकवाड कुटुंबाचे बँक लॉकर, सोने आणि रोख रक्कम जप्त करताना १००-१५० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. नागपूर खंडपीठात 6 जून रोजी वकिल कराड यांनी सुपेकरांवर गंभीर आरोप करत याचिका दाखल केल्याची माहिती दिली आहे.

कराड यांचा आरोप आहे की सुपेकर यांनी गायकवाडांना धमकावले, त्यांचा जामीन मिळवण्यासाठी ५०० कोटी रुपयांची मागणी केली आणि सुपेकर यांनी गायकवाडांना छळण्यास नकार देणाऱ्या काही तुरुंग कर्मचाऱ्यांना निलंबितही केले होते. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
भाजप आमदार सुरेश धस यांनी यापूर्वी सुपेकर यांनी तुरुंगातील कैद्यांकडून ३०० कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला होता, ज्यामुळे वरिष्ठ अधिकारी जालंदर सुपेकरवरील आरोपांच्या यादीत भर पडली आहे. या प्रकरणामुळे व्यापक संताप निर्माण झाला आहे, अनेकांनी सुपेकर यांचे निलंबन करण्याची आणि आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. नागपूर खंडपीठाने याचिकेची दखल घेतली आहे आणि लवकरच या प्रकरणाची सुनावणी होण्याची अपेक्षा आहे.







