Satara : सातारा जिल्हा परिषदेतील त्रिशंकू स्थितीमुळे सत्तासमीकरणांवर पडदा अद्याप पडलेला नसताना, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केलेल्या मिश्किल वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे पाहत, “त्यांच्या पालकत्वाखाली आम्ही आहोत. हातात हात काय, मिठी मारायलाही तयार आहोत; फक्त त्यांना ते चालतंय का बघा,” अशी कोपरखळी मारली. त्यांच्या या विधानावर उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ उसळला.

जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील संभाव्य समीकरणांबाबत चर्चा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर दोन्ही नेते एकत्र दिसल्याने राजकीय संकेतांचे अर्थ लावले जात आहेत. “मला बोलावले आणि मी गेलो नाही असे कधी झाले नाही. याआधी थेट निरोप मिळाला नव्हता,” असे म्हणत शिवेंद्रराजेंनी सूचक टोला लगावला.
पत्रकारांनी दोघे एकत्र येणार का, असा थेट प्रश्न विचारल्यावर शिवेंद्रराजेंनी सावध भूमिका घेतली. “संख्याबळ जरी भाजपकडे अधिक असले तरी पालकमंत्री मोठे आहेत. मोठ्यांनी सामावून घ्यावे,” असे ते म्हणाले. पूर्वीच्या बैठकींना गैरहजर राहिल्याबाबत विचारले असता, “त्यावेळी वातावरण ठीक नव्हते; आता परिस्थिती बदलली आहे,” असे उत्तर देत त्यांनी वातावरण हलके केले. त्यावर शंभूराज देसाईही हसले.
दरम्यान, पाटणमधील निवडणुकीत भाजप नेत्यांनी वैयक्तिक टीका केल्याचा उल्लेख करत देसाईंनी अलीकडेच “अति तिथे माती” असा इशारा दिला होता. स्थानिक राजकारणातील ही पार्श्वभूमी लक्षात घेतली तर साताऱ्यातील सत्ता स्थापनेची गणिते केवळ अंकगणितावर नव्हे, तर व्यक्तीगत समीकरणांवरही अवलंबून असल्याचे स्पष्ट होते.
आता जिल्हा परिषदेत कोणता पक्ष कुणाच्या हातात हात घालतो, की ‘मिठी’ मारतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.







