Pune News: पुणे : पुणे जिल्ह्यातील मौजे सणसवाडी येथील एका विहिरीत एक तरुण बुडाल्याची घटना घडली होती. पीएमआरडीएच्या पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद दलाने 20 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता शोध मोहीम राबवून त्या तरुणाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. मृत व्यक्तीचे नाव रितेश बजाबा हरगुडे (वय 24) असे आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. Pune News

शनिवारी पहाटे सणसवाडी गावात एका व्यक्तीच्या विहिरीत बुडाल्याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाली. याबाबतची खबर पीएमआरडीएच्या पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद दलाला देण्यात आली. माहिती मिळताच पीडीआरएफचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर विहिरीत एक व्यक्ती बुडाल्याचे स्पष्ट झाले.
पहाटे सुमारे 4:00 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बचाव पथकाने तात्काळ शोध मोहीम सुरू केली. यासाठी लाईफ रिंग, लाईफ जॅकेट, ग्रॅपलिंग हुक आणि दोरीचा वापर करण्यात आला. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात यश आले.
ग्रॅपलिंग हुकच्या सहाय्याने मृतदेह पाण्याच्या पृष्ठभागावर आणण्यात आला. त्यानंतर मृतदेह विहिरीबाहेर काढून पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर बचाव पथक वाहनासह आपल्या तळावर परतले. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून तरुणाचा नेमका मृत्यू कशाने झाला याचा तपास करत आहे.







