Pune News : पुणे शहरात ‘ओला’ (Ola) आणि ‘उबेर’ (Uber) या ॲप-आधारित वाहतूक सेवा प्रवाशांसाठी सुविधा ठरण्याऐवजी आता डोकेदुखी ठरत आहेत. ॲपमध्ये भाडे निश्चित झाल्यानंतरही रिक्षा आणि टॅक्सी (कॅब) चालकांकडून प्रवाशांची सर्रास लूटमार सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. निश्चित भाड्यापेक्षा अधिक रक्कम उकळणे, बुकिंग रद्द करणे आणि लांब पल्ल्यासाठी जादा पैशांची मागणी करणे अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने पुणेकर नागरिक मेटाकुटीला आले आहेत. (Pune News)

सध्या पुणे शहरात ॲप-आधारित सेवांचा गैरफायदा काही चालक मोठ्या प्रमाणात घेत आहेत. ॲपवर भाडे निश्चित झाल्यानंतरही, चालक प्रवाशाला थांबवून निश्चित भाड्यापेक्षा १० ते ५० रुपये अधिक देण्याची मागणी करतात. जर प्रवाशांनी या मनमानीस नकार दिला, तर चालक लगेच बुकिंग रद्द करतात किंवा प्रवासादरम्यान वाद घालून प्रवाशाला उतरवून देतात. विशेषतः, सायंकाळच्या गर्दीच्या वेळी आणि कमी अंतरासाठी जाणाऱ्या प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. रिक्षा चालक आणि कॅब चालक दोघेही ही मनमानी करत असल्याने, ज्या सुविधेसाठी नागरिक ॲप्सचा वापर करतात, ती सुविधाच आता फसवणुकीचे माध्यम ठरत आहे.
प्रवाशांकडून होणारी ही फसवणूक आणि लूट त्वरित थांबवण्यासाठी पुणेकरांकडून वाहतूक पोलिसांना आणि संबंधित ॲप कंपन्यांना कठोर पाऊले उचलण्याची मागणी केली जात आहे. ॲप-आधारित कंपन्यांनी त्यांच्या चालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर नियम लागू करणे, प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेणे आणि दोषींवर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा, ही लूटमार थांबवण्यासाठी वाहतूक विभागालाच हस्तक्षेप करून या कंपन्यांवर आणि चालकांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.







