Pune News : शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तारणाऱ्या सीमांमुळे निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या मोठ्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन, पुणे पोलिस आयुक्तालयाच्या रचनेत आतापर्यंतचे सर्वात मोठे फेरबदल करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. सध्याच्या संरचनेत मोठे बदल केले जात असून, लवकरच राज्य सरकारकडून औपचारिक शासन आदेश जारी होण्याची शक्यता आहे. या बदलांमुळे पोलिसांचे क्षेत्रीय नियंत्रण अधिक मजबूत होऊन, नागरिकांना मिळणारा प्रतिसाद अधिक प्रभावी होईल. Pune News

पोलिस दलाला नवीन अधिकारी मिळणार
या नवीन आणि सुधारित संरचनेनुसार, पुणे पोलिस दलाला पोलीस उपायुक्त (DCP) दर्जाचे दोन नवीन अधिकारी मिळणार आहेत. या दोन अधिकाऱ्यांच्या वाढीमुळे पुणे पोलिस आयुक्तालयातील उपायुक्तांची संख्या ५ वरून ७ होणार आहे. याच बदलांच्या अनुषंगाने, शहरात सध्या कार्यरत असलेल्या पाच क्षेत्रीय झोनमध्ये वाढ होऊन झोन ६ आणि झोन ७ अशा दोन नवीन झोनची निर्मिती केली जाणार आहे. परिणामी, पुणे शहरात आता एकूण सात झोन कार्यरत असतील. या झोनच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर गुन्हेगारी नियंत्रणाचे काम अधिक प्रभावीपणे होईल.
गुन्हेगारीवर नियंत्रण मिळणार
शहराचा विस्तार लक्षात घेऊन, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी पाच नवीन पोलीस ठाणी स्थापन करण्याची योजना आहे. नर्हे, लक्ष्मीनगर, येवलेवाडी, मांजरी आणि लोहगाव या वेगाने विकसित होत असलेल्या परिसरांना लवकरच स्वतंत्र पोलीस स्टेशन मिळणार आहेत. ही पाच नवी पोलीस ठाणी कार्यान्वित झाल्यानंतर, पुणे शहरातील एकूण पोलीस स्टेशनची संख्या ४० वरून ४५ होणार आहे. वाढत्या नागरीकरणानुसार पोलिस दलात होणारी ही वाढ अपरिहार्य होती. या बदलांमुळे व्यवस्थापन अधिक सुटसुटीत होणार असून, गस्त, गुन्हेगारी नियंत्रण आणि नागरिकांच्या तक्रारींसाठी तत्काळ प्रतिसाद देणे अधिक प्रभावी होईल. शासन आदेश जारी होताच ही सुधारित रचना त्वरित अंमलात आणली जाईल. अशी माहिती देण्यात आली आहे.







