Pune Indigo Flight : मागील काही दिवसांपासून सेवा आणि वेळापत्रकावरून टीकेचे लक्ष्य ठरलेल्या इंडिगो (IndiGo) विमान कंपनीचा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. गुरुवारी रात्री नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या प्रवाशांसोबत एक धक्कादायक प्रकार घडला. रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी नागपूर-पुणे मार्गासाठी उड्डाण घेतलेले हे विमान पुण्याला येण्याऐवजी थेट हैदराबाद येथे पोहोचले आणि प्रवाशांना मध्यरात्री हैदराबाद विमानतळावर सोडण्यात आले. पुण्याला पोहोचण्याची अपेक्षा असलेल्या प्रवाशांना अचानक दुसऱ्याच शहरात उतरवल्यामुळे त्यांच्यात प्रचंड गोंधळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Pune Indigo Flight)

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरहून उड्डाण घेतल्यानंतर पुणे विमानतळावर रात्री उशिरा विमानाला लँड करण्यासाठी जागा (Slot) उपलब्ध नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे इंडिगो कंपनीकडून सांगण्यात आले आहे. मात्र, या अनपेक्षित बदलामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनेक जण महत्त्वाच्या कामानिमित्त पुण्याकडे निघाले असताना, त्यांना मध्यरात्री हैदराबादला उतरवल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे हजारो प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडले असून, याआधीही अनेक शहरांमध्ये इंडिगोची विमान उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.

इंडिगोमध्ये अलीकडच्या काळात कर्मचाऱ्यांचा तुटवडा आणि ‘फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन’ (FDTL) च्या नव्या नियमांमुळे संचलन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. नव्या नियमांतर्गत वैमानिकांचा साप्ताहिक विश्रांतीचा कालावधी वाढवण्यात आला आहे, तसेच रात्रकालीन विमान उतरवण्याची संख्याही मर्यादित करण्यात आली आहे, ज्यामुळे कंपनीला कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, उड्डाणांमध्ये होणारा प्रदीर्घ विलंब आणि ती रद्द होण्याचे प्रकरण नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) गांभीर्याने घेतले असून, त्यांनी याबाबत इंडिगो कंपनीकडून विस्तृत स्पष्टीकरण मागितले आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीने माफी मागितली असली तरी, अशा गोंधळामुळे इंडिगोच्या सेवेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.








