Pune : पुण्यात मद्यपान करून वाहन चालवण्याच्या प्रकारात चिंताजनक वाढ दिसून येत आहे. वाहतूक पोलिसांनी यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत 2000 पेक्षा अधिक मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली असली तरी काही जण पुन्हा त्याच गुन्ह्याची पुनरावृत्ती करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता अशा चालकांविरोधात अधिक कठोर कारवाई करण्याचा निर्णय पुणे वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. दुसऱ्यांदा मद्यपान करून वाहन चालवताना आढळलेल्या चालकांचा ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यासोबतच त्यांना न्यायालयीन प्रक्रियेनंतर कारागृहात पाठवण्याची तयारी पोलिसांनी दर्शवली आहे.

पुणे शहरात गेल्या वर्षी तब्बल 6700 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली होती. त्यापैकी 67 जण पुन्हा मद्यपान करून वाहन चालवताना पकडले गेले. या चालकांचे परवाने रद्द करण्यात आले आणि काही प्रकरणांमध्ये न्यायालयाने कारावासाची शिक्षा देखील सुनावली. यंदाच्या वर्षातही अशा प्रकारची पुनरावृत्ती दिसून येत असून आतापर्यंत 14 जण दुसऱ्यांदा मद्यपान करून वाहन चालवताना आढळले आहेत. त्यांच्या विरोधातही कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.
दरम्यान, शहरात 6 ते 8 मार्च दरम्यान वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. शहरातील प्रमुख रस्त्यांवर सुमारे 30 ठिकाणी नाकाबंदी करून ब्रेथ अॅनालायझरच्या साहाय्याने वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत 189 चालक मद्यपान करून वाहन चालवत असल्याचे आढळले. पकडलेल्या चालकांचे 11 मार्च रोजी येरवडा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात समुपदेशन करण्यात आले. या कार्यक्रमाला 135 जण उपस्थित होते. समुपदेशनादरम्यान मद्यपान करून वाहन चालवण्याचे गंभीर परिणाम, अपघातांचा धोका आणि कायदेशीर शिक्षा याबाबत माहिती देण्यात आली.
वाहतूक तज्ज्ञांच्या मते, मद्यपान केल्यानंतर वाहन चालवल्यास चालकाचे नियंत्रण कमी होते आणि गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे केवळ शहरातील रस्त्यांवरच नव्हे तर राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरही अशा मोहिमा अधिक तीव्र करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. नियमांचे काटेकोर पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.







