Pune Cyber Crime : पुणे : “फोन करायचा आहे” असे सांगून मोबाईल मागणाऱ्या ओळखीच्या व्यक्तीनेच महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार मारुंजी परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणात 56 वर्षीय महिलेच्या खात्यातून सुमारे 1 लाख रुपये काढण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश विश्राम सोनवणे (रा. चाळीसगाव, जि. जळगाव) हा संबंधित महिलेच्या ओळखीचा होता. 21 नोव्हेंबर 2025 ते 24 मार्च 2026 या कालावधीत तो तिच्या घरी येत-जात होता. एके दिवशी त्याने फोन करण्याच्या कारणाने महिलेचा मोबाईल मागितला. ओळखीचा असल्याने महिलेने कोणताही संशय न घेता मोबाईल त्याला दिला.

मोबाईल मिळाल्यानंतर आरोपीने त्यातील बँकिंग अॅपचा गैरवापर करून हळूहळू पैसे स्वतःच्या खात्यात वळवले. काही दिवसांतच त्याने एकूण 1 लाख 8 हजार 584 रुपये ट्रान्सफर केल्याचे समोर आले. पैसे कमी झाल्याचे लक्षात येताच महिलेने तातडीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
दरम्यान, मोबाईल कोणालाही देताना आणि बँकिंग अॅप वापरताना विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला पोलिसांनी नागरिकांना दिला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.







