इंदापूर, ता. १२ : शेतीच्या वादातून तिघांनी थार गाडीतून येत शेतकऱ्यावर लोखंडी रॉड व काठ्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना कांदलगाव (ता. इंदापूर) ग्रामपंचायत हद्दीत १० जूनला रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मारहाणीत जखमी झालेल्या शेतकऱ्याच्या हाताच्या करंगळीला फ्रॅक्चर झाले असून, उपचारासाठी दाखल असताना रुग्णालयातही येऊन आरोपींनी गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संदीप दशरथ तुपे, सागर संजय तुपे आणि रज्जाक शेखलाल पठाण अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुभान रसूल नायकोडे (वय ३८, रा. कांदलगाव, ता. इंदापूर) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायकोडे हे शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर संजय तुपे हा नायकोडे यांच्या घरासमोर येऊन त्यांचा भाऊ दस्तगीर याच्याबाबत वाद घालत शिवीगाळ करून १० जूनला सायंकाळी निघून गेला. त्यानंतर रात्री सुमारे ९.१५ वाजता संदीप दशरथ तुपे, सागर संजय तुपे आणि रज्जाक शेखलाल पठाण हे काळ्या रंगाच्या नंबर नसलेल्या थार गाडीतून नायकोडे यांच्या घरासमोर आले.
शेतीच्या प्रलंबित न्यायालयीन वादाच्या कारणावरून तिघांनी शिवीगाळ करत हल्ला चढविला. यावेळी संदीप तुपे याने लोखंडी रॉडने सुभान नायकोडे यांच्या हातावर वार केला, तर सागर तुपे आणि रज्जाक पठाण यांनी लाकडी काठ्यांनी पाठीवर आणि खांद्यावर मारहाण केली. आरडाओरडा ऐकून कुटुंबीय मध्यस्थी करण्यासाठी आले असता त्यांनाही धक्काबुक्की व मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मारहाणीनंतर आरोपींनी “पुन्हा समोर आलास तर जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत घटनास्थळावरून पलायन केले. जखमी सुभान नायकोडे उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले असता, तेथेही आरोपी येऊन “गोळ्या घालून मारून टाकू” अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, या मारहाणीत सुभान नायकोडे यांच्या डाव्या हाताच्या करंगळीला फ्रॅक्चर झाले असून त्यांच्यावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी संदीप तुपे, सागर तुपे आणि रज्जाक पठाण या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार कुंभार करीत आहेत.






