थेऊर, (पुणे) : “काही पैसे रोख आणि उरलेले ऑनलाईन देतो” असे म्हटल्याचा राग आल्याने हॉटेलवरील काऊंटर चालक आणि त्याच्या 3 ते 4 साथीदारांनी दोघांना काठी व लाकडी बांबूने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. कोलवडी (ता. हवेली) येथील काकांच्या हॉटेल येथे ही शुक्रवारी (ता. 05) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली.

याबाबत स्वप्निल दत्तात्रय दळवी, (वय 27, धंदा व्यवसाय, रा. मु. पो. मांजरी बुद्रूक, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हॉटेलचे काऊंटर चालक मनोज आप्पासाहेब गायकवाड व अज्ञात तिघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल दळवी हे एका कंपनीत संचालक आहेत. शुक्रवारी रात्री त्यांचे मित्र आकाश रमेश हिरणवाळे यांच्यासह कोलवडी येथील काकांच्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी कारमधून गेले होते. जेवण झाल्यानंतर स्वप्निल हे बिल देण्यासाठी कारमधून पैशांचे पाकीट घेऊन हॉटेलच्या काऊंटरवर आले. ते पाकिटातून पैसे काढून काऊंटरवरील मनोज गायकवाड याला देत असताना, तो स्वप्निल यांच्यावर “तुम्ही पैसे न देता कुठे जाता?” असे ओरडला.
स्वप्निल यांनी मी तुम्हाला एक हजार रुपये रोख देतो आणि राहिलेले पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करतो,” असे सांगितले. एवढे ऐकताच हॉटेल चालक मनोज गायकवाड याने तात्काळ काऊंटरच्या खाली ठेवलेली काठी हातात घेतली आणि स्वप्निल यांना शिवीगाळ करत थेट त्यांच्या डोक्यात प्रहार केला.स्वप्निल यांनी मारहाण न करण्यास सांगितले असता, हॉटेल चालकाने मदतीसाठी हॉटेलमधील इतर लोकांना आवाज दिला.
यावेळी स्वप्निल यांचे मित्र आकाश हिरणवाळे हे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला आले असता, हॉटेलमधील 3 ते 4 अनोळखी लोकांनी आकाश यांना घेरले आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात आकाश यांच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली.साथीदारांनी स्वप्निल दळवी यांना पकडून हॉटेलच्या बाहेर असलेल्या फॅमिली रूममध्ये खेचत नेले. तिथे त्यांनी लाकडी बांबूने स्वप्निल यांच्या डोक्यात, पाठीवर, डाव्या दंडावर आणि उजव्या पायावर जबर मारहाण केली.
या मारहाणीत स्वप्निल यांच्या डाव्या कानातून आणि उजव्या पायातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. या झटापटीत हॉटेलमधील लॅपटॉपला धक्का लागून तो खाली पडला, त्याचा राग काढून आरोपींनी उलट जखमी तरुणांकडेच लॅपटॉपच्या भरपाईची मागणी करत दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, ससून रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर स्वप्निल दळवी यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चौघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार वाळके करीत आहेत.






