इंदापूर, ता. १२ : दौंड विधानसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधा, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि क्रीडा क्षेत्राच्या विकासाला गती देण्यासाठी आमदार राहुल कुल यांनी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची भेट घेत विविध सहा महत्त्वाच्या विषयांवर तातडीने विशेष बैठका आयोजित करण्याची मागणी केली.

पुणे-सोलापूर (हडपसर-यवत) तसेच पुणे-शिरूर महामार्गावरील प्रस्तावित उन्नत मार्गाच्या कामामुळे भविष्यात निर्माण होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी रस्त्यांचे पूर्वनियोजन करण्याची मागणी आमदार कुल यांनी केली. यासाठी सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी भांडगाव, खडकी, देऊळगाव राजे, पारगाव आणि पाटस येथे उपक्रीडा संकुल उभारण्यासाठी आवश्यक शासकीय जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत शेतमालासाठी उपबाजार आवार उभारण्याच्या दृष्टीने केडगाव आणि पाटस येथील शासकीय जमीन विनामूल्य उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच भूजल पातळी वाढवण्यासाठी पाटस, केडगाव, भांडगाव आणि ताम्हणवाडी परिसरात वन विभागाच्या हद्दीत नवीन तलाव उभारणीसाठी स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी करण्यात आली.
‘मनरेगा’ अंतर्गत बिहार राज्यातील यशस्वी वृक्षलागवड पॅटर्नच्या धर्तीवर दौंड मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबविण्यासाठी आवश्यक निधी व नियोजनाबाबतही विशेष बैठकीची मागणी करण्यात आली. याशिवाय, वनजमिनींसंदर्भातील ७/१२ उताऱ्यावरील नोंदी अद्यावत करण्यासाठी महसूल व वन विभागाची संयुक्त बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या प्रलंबित अडचणी सोडविण्याची मागणी आमदार राहुल कुल यांनी केली.
दरम्यान, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी या सर्व मागण्या सकारात्मकपणे ऐकून घेतल्या असून, संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत येत्या काही दिवसांत विशेष बैठका आयोजित करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.






