Pune Crime : आंतरराज्यीय चोरी करणारा अट्टल चोरट्याला फुरसुंगी पोलीसांनी भेकराईनगर बस डेपोच्या परिसरातून मोठ्या शिताफीने 1 डिसेंबरला अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 1 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 8 गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले आहे. तसेच चोरीच्या गुन्ह्यातील 5 लाख रुपयांची बँकेतील रक्कम पोलिसांनी फ्रीज केली आहे.

महेश लक्ष्मीकांत पुजारी (वय 21, रा. मु.पो. हत्तीकनबस, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी विशाल यादव (रा. मळाईपार्क, फुरसुंगी, पुणे) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल यादव यांच्या घरी 28 नोव्हेंबरला चोरी झाली होती. याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 305. 331(4), 324(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच याच परिसरातील दुकानामध्ये अशाच प्रकारची घटना होऊन अंदाजे चार लाख रुपये चोरी झाले होते.
एकाच ठिकाणी दोनदा चोरीची घटना घडल्याने पोलीसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी कंबर कसून सर्वत्तोपरी शोध सुरु केले. चोरी करणाऱ्या अज्ञात आरोपीचा सीसीटीव्ही फुटेजवरून मिळालेल्या वर्णनाचे इसमांकडे तपास करण्यात येत होता. अज्ञात आरोपीचा शोध घेणे पोलीसांपुढे आव्हान निर्माण झाले होते. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात फुरसुंगी पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस उपनिरीक्षक विष्णु देशमुख व त्याच्या सहकाऱ्यांचे पथक तयार केले.
पथकातील पोलीस हवालदार नितीन गायकवाड, पोलीस अंमलदार हेमंत कामठे यांना वरील गुन्ह्यातील संशयीत चोरटा हा भेकराईनगर बसस्टॉपसमोर येथे उभा आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर परिसरामध्ये शोध घेतला. परंतु, संशयीत इसमास पोलीस आल्याची चाहूल लागल्याने तो पळून जाण्याचे तयारीत होता. परंतु, पोलिसांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करू मोठ्या शिताफीने अटक केली आहे.
दरम्यान, आरोपी महेश पुजारी याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपीने फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन्ही गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली आहे. तसेच चोरीतील रोख रक्कम मौजमजेसाठी खर्च करून उर्वरीत पैसे त्याचे बँकखाती जमा केले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर पोलिसांनी बँक खात्यातील 5 लाख रुपये रक्कम चोरीतील असल्याची खात्री झाल्यानंतर आरोपी महेश पुजारीचे बँक खाते फ्रिज केले आहे. आरोपीविरुध्द यापूर्वी अक्कलकोट, सोलापूर, हुबळी (कर्नाटक) येथील एकुण 8 गुन्हे उघडकीस आणण्यास फुरसुंगी पोलिसांना यश आले आहे. आरोपीने चोरी करण्याकरीता वापरलेली होंडा शाईन दुचाकी, स्कू ड्रायव्हर, लोखंडी पाने, पक्कड, कपडे, असे एकुण 1 लाख 34 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मागदर्शनाखाली फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे,पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश खांडे, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक विष्णू देशमुख, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, हरिदास कदम, सागर वणवे, श्रीनाथ जाधव, पोलीस अंमलदार हेमंत कामठे, अभिजित टिळेकर, योगेश गायकवाड, विनायक पोमण व नितीन सोनवणे यांच्या पथकाने केली आहे.







