पुणे : बारामती येथील एअरफिल्डवर प्रशिक्षण सुरू असताना एक लहान विमान धावपट्टीवरून बाहेर गेल्याची घटना घडली. VT-SEX नोंदणी क्रमांक असलेले हे विमान सरावादरम्यान रनवेच्या पुढे जाऊन उजव्या बाजूला घसरले. मात्र, विमानात असलेल्या दोन्ही व्यक्ती सुखरूप असल्याने मोठा धोका टळला आहे.आता या अपघाताची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एअरफिल्डवरील रनवे 29/11 वर आपत्कालीन लँडिंग आणि टेक-ऑफचा नियमित सराव सुरू होता. या विमानाचे नियंत्रण कॅप्टन चिराग शशिकांत डोईफोडे यांच्याकडे होते, तर त्यांच्यासोबत कॅडेट अभिजीत जुंद्रे विमानात उपस्थित होते.
सकाळी सुमारे 06:39 UTC वाजता विमानाने सरावासाठी टॅक्सी-आउट केले होते. सुरुवातीला लिंक ब्राव्हो मार्गिकेतून विमान रनवेवर आले. प्रथम रनवे 29 आणि त्यानंतर रनवे 11 वरून टेक-ऑफ करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु सरावाचा भाग म्हणून दोन्ही वेळेस टेक-ऑफ रद्द करण्यात आले. यानंतर धावपट्टीवर विमान पूर्णपणे थांबवण्याचा (फुल स्टॉप) सराव केला जात होता.

याच प्रक्रियेदरम्यान वेग नियंत्रित न झाल्यामुळे विमान रनवे 29 च्या मर्यादेच्या पलीकडे गेले. पुढे असलेल्या पक्क्या भागावरून उजवीकडे वळत ते थेट धावपट्टीच्या बाहेर गेले. विमान अचानक घसरल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेत कॅप्टन आणि कॅडेट दोघांनाही कोणतीही दुखापत झालेली नाही, तसेच जीवितहानी टळली आहे. विमान नेमके कशामुळे धावपट्टीवर वेळेत थांबले नाही आणि घसरले, याचा अचूक कारणशोध घेण्यासाठी नागरी विमान वाहतूक यंत्रणेकडून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.







