मुंबई: भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे आणि शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात नुकतीच मुंबईत एक गुप्त बैठक पार पडली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. शरद पवार यांचा गट महायुतीसोबत सत्तेत सामील होणार का आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार का, अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन पक्ष महायुतीत सामील होण्याची शक्यता साफ फेटाळून लावली. ते म्हणाले, “सध्या महायुतीत जे पक्ष आहेत, तेच कायम राहतील. कोणत्याही नवीन पक्षाला एनडीएमध्ये घेण्याबाबत आमची कोणतीही चर्चा सुरू नाही.” इतकेच नव्हे तर, शरद पवार यांच्या पक्षातील कोणत्याही आमदार किंवा खासदाराला फोडण्याचा भाजपचा कोणताही विचार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सूत्रांच्या माहितीनुसार, विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्यातील बैठकीत जर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) महायुतीत सामील झाली, तर पक्षाला सत्तेत काय वाटा मिळू शकतो, यावर प्राथमिक चर्चा झाली होती. या भेटीनंतर जयंत पाटील यांनी आपल्या पक्षातील एका वरिष्ठ नेत्यासोबतही चर्चा केली आहे.
या संपूर्ण प्रकरणावर स्वतः जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विनोद तावडे यांच्यासोबत भेट झाल्याची गोष्ट मान्य केली. परंतु, ही केवळ एक ‘अनौपचारिक भेट’ होती, असे सांगत त्यांनी यातील राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या थेट विधानामुळे आता तावडे आणि पाटील यांच्यातील ही चर्चा निष्फळ ठरल्याचे चित्र दिसत आहे. आगामी काळातील राजकीय घडामोडींवरूनच या भेटीमागचे खरे कारण काय असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.






