Nagpur : भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. खोपडे म्हणाले की, मुंढे हे कोरोना काळात नागपूर महानगरपालिकेत रुजू झाले आणि फक्त सात महिन्यांच्या कार्यकाळातच अनेक गैरप्रकार केले. त्यांच्या हातात स्मार्ट सिटी प्रकल्पाचे अधिकार नव्हते, तरीही त्यांनी नियम मोडून एका कंत्राटदाराला २० कोटी रुपयांचा धनादेश दिला.

भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी तुकाराम मुंढे यांच्याविरोधात लक्षवेधीतून आपली बाजू मांडणार असल्याचे सांगितले. खोपडे म्हणाले की, मुंढे हे केवळ मीडिया आणि एनजीओप्रेमी आहेत आणि नागपूर महानगरपालिकेत त्यांच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे सभागृहातही त्यांनी मागणी केली की तुकाराम मुंढे यांना तातडीने निलंबित करून अटक करावी.
खोपडे यांनी सांगितले की, मुंढे यांनी महापालिकेच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार स्वतःच्या हाती घेतला आणि प्रकल्पातील महिला अधिकाऱ्यांवर छळही केला. महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलं की एका आयएएस अधिकाऱ्याविरुद्ध दोन महिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. कोरोना काळात उद्धव ठाकरे सरकार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दबाव असल्यामुळे काहीही होऊ शकले नाही.
खोपडे म्हणाले की, “माहितीचा अधिकार वापरून आम्ही सर्व माहिती मागवली आहे. मुंढे यांनी कोरोना काळात नागपूरमध्ये कसा सत्यानाश केला, हे आम्ही लोकांसमोर मांडणार आहोत. सभागृहातही आम्ही मागणी करणार आहोत की तुकाराम मुंढे यांना तातडीने निलंबित करून अटक करावी.”






