Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामांवरून पुन्हा एकदा विधान परिषदेत चर्चा रंगली. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केले की, माणगाव आणि इंदापूर बायपास वगळता उर्वरित Mumbai-Goa Highway (NH-66) मे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पुढील गणेशोत्सवापूर्वी संपूर्ण मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

हा महामार्ग कोकणातील जनतेसाठी जीवनरेषा मानला जातो. पर्यटन, शेतीमालाची वाहतूक आणि मुंबई-पुण्यातील नोकरीसाठी स्थलांतरित नागरिकांची ये-जा या सर्वांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत कामाच्या विलंबामुळे नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होत असल्याची भावना आहे. आमदार निरंजन डावखरे यांनी या प्रकल्पावर टीका करताना ‘अटल सेतू आणि समृद्धी महामार्ग पूर्ण झाले, पण मुंबई-गोवा महामार्ग अद्याप अपूर्ण आहे’, असे सांगत सरकारला जाब विचारला.
मंत्र्यांनी उत्तर देताना सांगितले की, माणगाव बायपासवरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम नव्या एजन्सीकडून सुरू आहे. माणगाव व इंदापूर बायपाससह 3 रेल्वे उड्डाणपूल आणि 2 मोठे पूल या टप्प्यात आहेत. ही कामे जुलै 2025 मध्ये सुरू झाली असून जुलै 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराकडून काम काढून घेऊन नव्या एजन्सीला देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गणेशोत्सव काळातील प्रचंड वाहतूक लक्षात घेता ताम्हिणी घाट बाह्यवळण मार्ग मेपूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे माणगाव शहरातील वाहतूककोंडी काही प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच आहे. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी अवजड वाहनांवर बंदी घातली असतानाही अलिबाग-रोहा मार्गावर वाहतूक सुरूच असल्याने कोंडीचे दुष्टचक्र कायम आहे. कुरूळ ते सुडकोली, रेवदंडा बायपास आणि इतर ठिकाणी रस्ते व ड्रेनेज कामांमुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. सलग सुट्ट्या आणि सणांच्या पार्श्वभूमीवर गावी जाणारे नागरिक, पर्यटक आणि स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे वेळेत पूर्णत्व केवळ प्रवास सुलभ करण्यासाठी नव्हे, तर कोकणातील आर्थिक गती वाढवण्यासाठीही अत्यावश्यक आहे. पुढील काही महिने या दृष्टीने निर्णायक ठरणार आहेत.





