युनूस तांबोळी
शिरूर : कान्हूर मेसाई ( ता. शिरूर ) येथील विद्याधाम माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिना निमित्त चैतन्य महाराज वाडेकर यांचे व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनात सुसंस्कृत संगतीला अधिक महत्व असल्याचे सांगितले.
यावेळी वाडेकर यांनी उदाहरण देताना सांगितले की, एका राज्यात चिंचेच्या झाडावर कावळा आणि राजहंस बसले होते. त्या राज्याचा राजा शिकारीवरून जात असताना त्याला वाटले की, या दुपारी चिंचेच्या झाडाखाली झोपून थोडी विश्रांती घ्यावी. त्याप्रमाणे हा राजा या झाडाखाली झोपला होता. पण झाडाच्या फांदीतून येणारी सुर्याची किरणे राज्याची झोप मोडत करत होती.
आपल्या राज्याच्या राजाची झोपमोड होऊ नये. ही आपलीही जबाबदारी आहे. असे कावळा व राजहंसाला वाटले. राजहंसाने आपल्या भल्या मोठ्या पंखाची सावली करून उन्हापासून राजाचा बचाव करू लागला. सावलीतल्या थंड वातावरणाने राजाला चांगली झोप आली होती. हे सर्व चांगले चालले असताना. तेथे असणाऱ्या कावळ्याला ते सहन झाले नाही.
‘असतात काही कावळे असेही,…
त्यांना चांगले पहावत नाही. तेथील कावळ्याने झोपलेल्या राज्याच्या कपाळावर गंध लावला. यावर उपस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये हशा झाला. महाराज म्हणाले की, विदयार्थी मित्रांनो तुमची मराठी चांगली आहे. तुम्हाला कावळ्याने गंध लावला म्हणजेच राज्याच्या कपाळावर कावळ्याने घाण टाकल्याचे लक्षात आले. कावळा मात्र तेथून निघून गेला. घाण केल्यावर तेथे कावळा थांबत नाही.
कारण “असतात काहि कावळे असेही”…!
राज्याची झोपमोड झाली त्याने कपाळावरून हात फिरवला. तशी ती घाण राज्याच्या हाताला लागली. आता राजा रागाने लालबुंन्ध झाला होता. त्याने कशाचाही विचार न करता धनुष्याला बाण लावला. सू…सू… सू… करत बाण सुटला तसा राजहंसाला लागला तसा तो ठार झाला. काहिही चूक नसताना सत्कर्म करणाऱ्या त्या राजहंसाचा शेवट झाला. त्याला चुकीची संगत कारणीभूत ठरली.
समाजात “असतात काहि कावळे असेही”…! त्यामुळे विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन करत असताना, स्पर्धात्मक परिक्षा देत असताना, संगत कोणाची करायची याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण समाजात “असतात काहि कावळे असेही”…! यावर मात्र संपुर्ण सभागृहात हशा व टाळ्या वाजत होत्या.