सागर जगदाळे
भिगवण: भिगवणला चोर पोलिसांची मिलीभगत नुकतीच उघड झाली आहे. स्वतःला सिंगम पोलीस समजणाऱ्या कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने चक्क चोरालाच पळून जाण्यास मदत केली आहे. स्वतः:ला सिंगम समजणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्याने चोर पकडून देणाऱ्या नागरिकांवरच त्यांना दमदाटी केली. आणि नागरिकांवरच गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन चोराकडून घेतलेल्या पोळीवरच तूप खाऊन डेकर न देता पोळी पचवून बसला आहे. मात्र या कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने जरी डोळे झाकून दुधावरील मलई खाल्ली असे वाटतं असले तरी या सिंघम पोलीस अधिकाऱ्याची लबाडी एक दिवस उघड होणार होतीच. ह्या अधिकाऱ्याने चोर पकडणाऱ्यांनाच कायद्याची भीती दाखवून गुन्हा दाखल न करण्यास भाग पाडले.
याबाबतची उपस्थित असणाऱ्या नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार की, मंगळवार (ता.ऑगस्ट) रोजीच्या मध्यरात्री भिगवण बसस्थानकासमोरील उड्डाणपुलाच्या खाली लावलेली बलेनो अज्ञात चोरट्याने गाडीची काच फोडून चोरून नेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर पळून जाणाऱ्या चोराला सोसायटी खाली गस्त घालणाऱ्या तरुणांनी पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, चोरट्याने तरुणांवर हल्ला केला. पण तरुणांनी सावध गिरीने त्याला पकडले.
तरूणांनी भिगवण पोलीस ठाण्याला फोन लावल्यानंतर पोलीस अधिकारी हे हाकेच्या अंतरावर असणाऱ्या प्रत्यक्षस्थळी दोन ते तीन तासांनी पोहचले. त्यानंतर उपस्थित गस्त घालणाऱ्या तरुणांना शाबासकी देण्याऐवजी त्यांना कायद्याची भीती दाखवली व चोराला त्यांनी ताब्यात घेतले. तेवढ्यात चोराने आपल्या भावाला भिगवणला बोलावून घेतले होते.
दरम्यान, बलेनो(एमएच ४२बी बी९००४)चे मालक यांनी पोलिसांना चोरट्याविरुद्ध तक्रार नोंदवुन घेण्यास सांगितली. पण कनिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्वतःच न्यायाधीश बनून तोडगा पाणी करण्यासाठी चोराला घेऊन पोलीस ठाण्याकडे निघून गेले. बलेनो गाडीच्या मालकाला नंतर ह्या महाशयांनी कळविले की चोराचा भाऊ ही गाडीची भरपाई देण्यास तयार असून त्याचा मोबाईल नंबर ही दिला. व यावर उद्या कॉल करून भरपाई घ्या. असे सांगितले.
स्वतःच न्यायाधीश बनून कनिष्ठ पोलीस अधिकारी यांनी मात्र चोरावर दाखविलेली माया ही नक्कीच संशयास्पद आहे. दिलेल्या नंबरवर गाडी मालक यांनी फोन लावला असता कोण तुम्ही? असे म्हणून समोरचा हात झटकून मोकळा झाला. यामुळे भविष्यात नक्कीच चोरांना न्याय देणारे व त्यांचे पाठीराखे म्हणून या कनिष्ठ पोलीस अधिकारीऱ्याचे बॅनर चौकाचौकात लागलेले पाहिला मिळतीळ व त्यावर आमचे पाठीराखे असा उल्लेख नक्की पाहायला मिळेल.
पुढे चोरावर गुन्हा दाखल झाला का? काही तोडपाणी होऊन चोराचा भाऊ चोराला घेऊन गेला की काय? हे मात्र गुलदस्त्यात आहे. पोलीसच असे वागायला लागले तर न्यायासाठी तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात उपस्थित राहिल्याशिवाय राहणार नाही. तोडपाण्यासाठी हपापलेल्या काही अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस खाते यामुळे बदनाम होते.अशा अधिकाऱ्यांवर नक्कीच गंभीर स्वरूपाची कारवाई झाली पाहिजे. असा सूर भिगवणकरांच्या बोलण्यातून उमटत आहे.