Israel Attacks Syria : गेल्या काही काळापासून मध्य पूर्वेमध्ये तणाव आणि संघर्ष वाढत आहे. या घडामोडींमध्ये इस्राईलचा सहभाग दिसून येत आहे. आता इस्राईलने इराण नाही तर सीरियावर हल्ला करत जगात खळबळ उडवून दिली आहे. इस्राईलने सीरियाची राजधानी दमास्कस येथे असलेल्या संरक्षण मंत्रालयाला लक्ष करत हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोमवारपासून इस्राईल सीरियाच्या इस्लामिक नेतृत्वाखालील सरकारच्या सैन्याला लक्ष्य करत आहे. इस्राईलने बुधवारी केलेला हल्ला सर्वात मोठा होता. या हल्ल्यामुळे दमास्कसमधील लोक प्रचंड घाबरले असून, लांबचं लांब धुराचे लोट दिसून येत आहेत. सीरियाच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दमास्कस येथे झालेले हल्ले इस्राईलने केले आहेत. यापूर्वी इस्राईलने या हल्ल्यांबाबत सिरियाला इशारा दिला होता.
इस्राईलने सीरियावर हल्ला करण्याचे कारण काय?
दक्षिण सीरियातील सुवेदा शहरात स्थानिक सुरक्षा दल आणि ड्रुझ समुदायाच्या लढाऊंमध्ये चकमकी झाल्याचे वृत्त आहे. यानंतर इस्राईलने सीरियन सैन्याला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. यापूर्वी, इस्राईलने दक्षिण सीरियातील ड्रुझ समुदायावर हल्ले थांबवले नाहीत तर सीरियन सैन्याला लक्ष करण्यात येईल अशी धमकी दिली होती.
दक्षिण सीरियातील सुवेदा शहरात ड्रुझ लढाऊ आणि सरकारी सैन्यामध्ये गेल्या काही काळापासून हिंसक संघर्ष सुरू आहे, ज्यामध्ये आतापर्यंत शेकडो लोक मारले गेले आहेत. ड्रुझ लोक इस्लामशी संबंधित एक वेगळा धर्म पाळतात आणि ते सीरिया, लेबनॉन आणि इस्राईलमध्ये राहतात. इस्राईलमधील ड्रुझ लोक सीरियातील ड्रुझ लोकांना मदत करण्याची मागणी करत आहेत
मंगळवारी, एका ड्रुझ धार्मिक नेत्याने सांगितले की, सीरियातील सरकारी सैन्य त्यांना क्रूरपणे मारत आहे. तर सरकारने म्हंटले आहे की, या हिंसाचारामागे सरकारचा हात नसून, गुन्हेगारी टोळ्यांचा हात आहे. असे म्हंटले आहे. अशातच इस्राईल आता ड्रुझ समुदायाच्या मदतीला आला असून, जर सरकारी सैन्याने ड्रुझ लोकांवरचे हल्ले थांबवले नाही तर असेच हल्ले होत राहतील असा इशारा दिला आहे.
ड्रुझ लोक कोण आहेत?
ड्रुझ नागरिकांना अरब मानले जाते. या समुदायाची उत्पत्ती ११ व्या शतकात इजिप्तमध्ये झाली. हा समुदाय सीरिया, लेबनॉन, जॉर्डन आणि इस्राईलमध्ये आहे. त्यांची संख्या सुमारे १० लाख आहे. हा समुदाय इस्लाम किंवा यहुदी धर्मावर विश्वास ठेवत नसून वेगळ्या धर्मावर विश्वास ठेवतो. ड्रुझ ज्या धर्माचे पालन करतात त्यात हिंदू, बौद्ध आणि इतर धर्मांचे मिश्रण आहे.






