पुणे : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार असल्याच्या चर्चाना जोर आला असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा आव्हाड यांच्या एका सोशल मीडिया पोस्टने राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. “जेव्हा एखादा राजकीय पक्ष किंवा त्याचे नेते सत्तेत जाण्याचा विचार करतात, तेव्हा काहीतरी गंभीर घटना घडते. त्यांनी याला ईश्वरी संकेत मानून जिथे आहेत तिथेच राहावे,” असे वक्तव्य नताशा यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या 15 दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या संपर्कात आहेत.14 आणि 15 जुलै रोजी जयंत पाटील, सुनील तटकरे व प्रफुल पटेल यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर 22 जुलै रोजी शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पाठोपाठ 23 जुलैला पार्थ पवार व प्रफुल पटेल शरद पवारांना भेटले, तर 27 जुलैला सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरेंनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर 28 जुलैला तटकरेंनी पुन्हा पंतप्रधान मोदींशी चर्चा केली.

दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चाललेल्या या गाठीभेटींमुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन एनडीएमध्ये सामील होणार की पक्षाचे विलीनीकरण होणार, अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवार आणि अजित पवार गटाचे नेते सकारात्मक भूमिका घेताना दिसत असले, तरी शरद पवारांनी एकत्र येण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे. तटकरेंनीही या भेटीमागे केवळ विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचा दावा केला आहे.

असे असले तरी, सातत्याने होणाऱ्या या उच्चस्तरीय बैठकांमागे काही मोठा राजकीय बदल दडला आहे का, असा सवाल निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नताशा आव्हाड यांच्या सूचक पोस्टने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे.







